अनिल देशमुखांविरोधातील गुन्ह्यात CBI कडून पहिली अटक

Update: 2021-11-01 03:27 GMT

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात पहिली अटक करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (CBI) संतोष शंकर जगताप याला ठाणे येथून अटक केली आहे. या प्रकरणी कोर्टाने संतोष जगतापला चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेने रविवारी संतोष शंकर जगताप याला अटक केली आहे. जगताप हे मध्यस्थ असल्याचे सीबीआयकडून सांगण्यात येत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर राज्याचे माजी गृहमंत्री देशमुख अडचणीत आले आहेत. गोपनीय कागदपत्रे लीक प्रकरणी सीबीआयने नुकतेच अनिल देशमुखांच्या काही ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती.

केंद्रीय तपास यंत्रणेने देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील काही ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांचा शोध घेण्यात आला होता. 2 सप्टेंबर रोजी तपास यंत्रणेने देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनाही अटक केली होती.

न्यायमूर्ती नितीन जामदार आणि एसव्ही कोतवाल यांच्या खंडपीठाने ईडी आणि सीबीआयला कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यापासून रोखण्याचे देशमुख यांची याचिकाही फेटाळली आहे.

मार्च महिन्यात जेव्हा परमबीर सिंग यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आलं त्यानंतर तीन दिवसात परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला 100 कोटी रूपये दर महिन्याला बार आणि रेस्तराँमधून वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं.

Tags:    

Similar News