आधी धनुष्यबाण चिन्हाचा निकाल लावा मग इतर सुनावणी घ्या, शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने 7 ऑक्टोबरपर्यंत शिवसेनेतील दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यापार्श्वभुमीवर एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीले आहे.

Update: 2022-10-07 01:59 GMT

पक्षचिन्ह आणि राजकीय पक्षाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यिय खंडपीठाने दिला. त्यामुळे शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा? हा वादाचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला आहे. त्यापार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि उध्दव ठाकरे यांचा गट या दोन्ही गटांना 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र 7 ऑक्टोबरपुर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून धनुष्यबाण चिन्ह आमचेच असून त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिवसेनेच्या 55 पैकी 41 आमदारांचा आणि 18 पैकी 12 खासदारांचा आम्हाला पाठींबा आहे. तसेच शिवसेनेच्या प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीने एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता आणि अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. शिवसेनेच्या 144 पदाधिकाऱ्यांनी आणि 11 राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच या दाव्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने प्रतिज्ञापत्र आणि इतर कागदपत्र सादर केले आहेत. तसेच अजून काही कागदपत्रं सादर करण्याची प्रक्रीया सुरू आहे. दरम्यान या पत्रात म्हटले आहे की, उध्दव ठाकरे यांचा गट अजूनही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करू शकले नाही. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह आमचे असून ते तातडीने आम्हाला देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने केली आहे.



या पत्रात पुढे म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने पक्षचिन्ह आणि राजकीय पक्षाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा असल्याचे म्हटले आहे. मात्र उध्दव ठाकरे यांच्या गटाकडे आवश्यक तेवढे समर्थन नाही. तरीही त्यांच्याकडून धनुष्यबाण चिन्हावर दावा केला जात आहे, असं शिंदे गटाने लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. याबरोबरच 3 नोव्हेंबरला अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणूकीत ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे हे चिन्ह तातडीने आम्हाला देण्यात यावे, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अर्जात धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली नाही. मात्र धनुष्यबाण चिन्हावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. 

Tags:    

Similar News