BJP अजून किती पक्ष गिळणार?राज असरोंडकर
कालपरवापर्यंत एनपीपी (NPP)आणि भाजपा (BJP) मेघालयात सत्तेत एकत्रच होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला आकस्मिक एनपीपीचा भ्रष्टाचार दिसू लागला. भाजपाचा आता राजकीय फंडाच झाला आहे. राज्यातला स्थानिक पक्ष हेरायचा, त्याचं शेपूट धरून त्या राज्यात शिरकाव करायचा, बांडगुळासारखं वाढायचं आणि कालांतराने तोच पक्ष गिळायचा डाव टाकायचा, वाचा भाजपच्या राजकारणाचा पोलखोल करणारा राज असरोंडकर यांचा लेख..
भ्रष्टाचाराचा नवा पाठ एनपीपी आणि काॅन्राड संगमा यांनी मेघालयात घालून दिलाय. त्यांना मेघालयातील जनता निवडणुकीत चांगलाच धडा शिकवेल. हा प्रचार करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने मेघालयात सरकार स्थापनेसाठी एनपीपी आणि काॅन्राड संगमा यांना पाठिंबा दिलाय आणि सत्तास्वार्थापुढे नैतिकतेची आम्हाला कसलंही देणंघेणं नाही, हे नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय.
महाराष्ट्रात शिवसेनेसोबत भाजपाने तेच केलं. शिवसेनेने महाविकास आघाडीत जाऊन हिंदुत्वाशी फारकत घेतली, हा प्रचार भाजपा सातत्याने करत आहे. हिंदुंच्या मनात शिवसेनेबद्दल अनादराचा भावना बनावी, यासाठी भाजपा चारी बाजूने हल्ला चढवत आहे. तीच भाजपा मेघालयात गोमांस खाणाऱ्यांसोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसणार आहे.
भाजपाचं समर्थन करणारी हिंदुत्ववादी मंडळी ख्रिश्चनांच्या विरोधात वारंवार गरळ ओकतात. धर्मप्रसाराचा आरोप करून ख्रिश्चन मिशनऱ्यांवर हल्ला चढवतात ; पण मेघालयात ख्रिश्चनांसोबत भाजपाचं सत्तास्थापन करणं या बधीरांना थोर कार्य वाटतं. भाजपाच्या या शरणागतीला ते मोदींचा मास्टरस्ट्रोक म्हणून गौरवतात.
भाजपाने मेघालयात सर्व ५९ जागा लढवल्या व २ जिंकल्या. २०१८ ला ४७ लढल्या होत्या, त्यातल्या ३२ जागांवर उमेदवारांचं डिपाॅझिट जप्त झालं होतं. २ जागा जिंकल्या होत्या. मतं घेतली होती ९.६३ टक्के ! यावेळी अधिक जागा लढवूनही मतं ९.३३ टक्के इतकी खाली उतरली. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांना ही घसरगुंडी पूर्वोत्तर राज्यात भाजपाची मोठी मुसंडी वाटते.
काॅन्राड संगमा यांच्यासमोर भाजपाने बर्नार्ड मराक हा उमेदवार दिला होता. मराक हा स्वतंत्र तुराची मागणी करणारा अलगाववादी अतिरेकी ! भाजपात येऊन तो पावन झाला. अलिकडेच जुलै महिन्यात त्याच्या फार्महाऊसवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मराकला अटक झाली होती. भाजपा मराकच्या पाठीशी उभं राहिली; कारण मराकशिवाय भाजपाचं मेघालयात पान हालणार नव्हतं. अशीच भूमिका भाजपाने गोव्यात बाबुश याही अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप असलेल्या गुन्हेगाराबाबत घेतली होती. गोवा निवडणुकीत बाबुश भाजपाचा चेहरा होता, तर मेघालयात बर्नार्ड मराक !
सत्तास्वार्थासाठी बर्नार्ड मराकचे केवळ इतकेच उपद्व्याप भाजपाने झेललेले नाहीत. २०१७ मध्ये मोदी सरकारची तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मराकने गोमांस पार्टीचं आयोजन केलं होतं. शिवाय, भाजपा सत्तेत आली तर मेघालयात गोमांसाचे दर कमी करू, अशी घोषणाही केली होती. त्यावेळी भाजपाने गोमांस पार्टीवर भाष्य न करता, गोमांसांचे दर कमी करण्याचा विचार नाही, म्हणून सारवासारव केली होती. बर्नार्ड मराक यांनी त्यावेळी भाजपाचा राजीनामा दिला होता. त्याच मराक याने २०२३ मध्ये संगमांविरोधात भाजपाकडून निवडणूक लढवली.
ऑगस्ट, २०२१ मध्ये आसामने गोसंरक्षण कायदा आणला तेव्हा मेघालयातील पशू संवर्धन मंत्री सनबोर शुल्लाई यांनी लोकांना चिकन, मटन, माशांहूनही अधिकाधिक गोमांस खा, असं आवाहन केलं होतं. लोकशाही देशात कोणी कोणाच्या खाण्यापिण्यावर निर्बंध आणू शकत नाही, असं शुल्लाई यांनी म्हटलं होतं. आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी आवाहन केलं होतं की नव्या कायद्यामुळे आसामधून मेघालयासाठी होणाऱ्या गोमांस पुरवठ्यावर काही परिणाम होऊ नये.
ताज्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे मेघालय प्रदेशाध्यक्ष अर्नेस्ट मावरी यांनीही मेघालयातील ख्रिश्चनांच्या गोमांस भक्षणाचं समर्थन केलं होतं. भाजपा सत्तेत आल्यास ख्रिश्चनांना संरक्षण देऊ, असं त्यांचं विधान होतं. गोमांस भक्षण ही आमची खाद्यसंस्कृती आहे, ती कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असं मावरी यांनी म्हटलं होतं.
जिथे मुस्लिमविरोधी राजकारण फळतं अशा युपीसारख्या भाजपाशासित राज्यात आजही गोमांसभक्षण तर दूर राहिलं, पण मांस बाळगल्याच्या संशयावरून मुस्लिमांच्या हत्येच्या घटना घडताहेत, तर जिथे गोमांसभक्षणाचं राजकारण कामी येऊ शकत नाही, तिथे गोमांस खाणाऱ्या ख्रिश्चनांना संरक्षण देण्याचं आश्वासन भाजपाच्या निवडणूक अजेंड्यावर असतं. लोकांची माथी भडकवण्यासाठी समान नागरी कायदा, हिंदुराष्ट्राचं लालुच पण सत्तास्वार्थासाठी हिंदुंच्या धर्मश्रद्धा फाट्यावर मारण्याचं राजकारण केवळ भाजपाच करे शकते, कारण हिंदुंमधला एक भाजपाइतकाच ढोंगी वर्ग ते चालवून घेतोय.
राज असरोंडकर
संपादक, मीडिया भारत न्यूज | संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ
kaydyanewaga@gmail.com