देशात कोरोनाचा नवीन व्हेरिएन्ट Omicronच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण आता यावरुन आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. देशात कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याला भाजप जबाबदार असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिला आहे. मलिक यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर टीका केली. उ. प्रदेशात पंतप्रधान मोदी जाहीरसभा घेत आहेत.
एकीकडे देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशसह पंजाब आणि उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला आहे. यावरुनच आता नवाब मलिक यांनी भाजपला लक्ष्य करत टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क वापरण्याचे आवाहन करत आहेत, पण भाजपचे लोक त्यांचे ऐकत नाहीत, उ. प्रदेशात योगी आदित्यनाथ, पंतप्रधान यांच्या प्रचारसभा थांबत नाहीयेत, त्यामुळे इतर राज्यांत निवडणुका असताना ज्याप्रमाणे दुसरी लाट आली तशीच तिसरी लाट निर्माण झाल्यास भाजप त्याला जबाबदार असेल असा आरोप मलिक यांनी केला.
पण यामागे भाजपचा डाव असल्याचा आरोपही करत ५ राज्यांच्या निवडणुका पुढे ढकलून राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही मलिक य़ांनी केला. राष्ट्रपती राजवट लादून अधिकार आपल्याकडे घेण्याचा कट आहे, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यापेक्षा प्रचाराला केवळ ५ लोक, दारोदारी जाऊन प्रचार करत निवडणुका घेता येऊ शकतात, असेही मलिक यांनी सांगितले. पण भाजपाला उत्तर प्रदेशात पराभव होण्याची भीती वाटत असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे.