"सरकारच्या हातालाच नाही, तर मेंदूलाही लकवा मारला आहे" ; चंद्रकांत पाटलांचा घणाघात
मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट गडद होत असताना दुसरीकडे राजकीय टोलेबाजी आणि आरोप-प्रत्यारोप थांबायचं नाव घेत नाहीये. भाजप नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना महाविकास आघाडीवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी २०१४ मध्ये शरद पवारांनी मारलेल्या टोल्याची देखील आठवण करून दिली आहे. २०१४ साली राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्यावेळी पवारांनी सरकारवर निशाणा साधल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.
शरद पवारांनी २०१४ साली राज्य सरकारच्या कारभारावर टीका केल्याचं म्हटलं आहे. "२००९ ते १४ या काळातल्या सरकारला शेवटी शेवटी पवार साहेब म्हणाले होते की, मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला आहे. त्यामुळे ते सहीच करत नाही. बाबांची (पृथ्वीराज चव्हाण) स्टाईल होती. की एक फाईल ते सगळी वाचल्याशिवाय सहीच करायचे नाहीत. मग ते खिशातून पेन काढायचे. टोपण काढायचे, पुन्हा लावायचे. आणि शेवटी पेन खिशाला लावून म्हणायचे नंतर बघू. त्यामुळे पवारांनी विधानसभा निवडणुकांच्या २ महिने आधी पाठिंबा काढून घेतला", असं पाटील म्हणाले.
"आता या सरकारच्या हातालाच नाही, तर मेंदूलाही लकवा मारला आहे. या सरकारची बुद्धीच चालत नाही. कोणतेही निर्णय या सरकारकडून घेतले जात नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप कशाला लांबायला हवा. सरकारी कर्मचाऱ्यांचे जेवढे फायदे आहेत, ते देता आले असते त्यांना. ६० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत", असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.