"पुढील निवडणुकांमध्येही तुम्हाला विरोधी पक्षातच बसायचे आहे"- चंद्रकांत पाटील

तुमच्या सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत केली नाही. त्यांना आश्वासन आणि दुर्लक्ष याशिवाय तुम्ही काय दिले? यावरून तुमचे शेतकऱ्यांवरील प्रेम दिसून येते, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली.;

Update: 2021-08-21 03:41 GMT

मुंबई : "पुढील निवडणुकांमध्येही तुम्हाला विरोधी पक्षातच बसायचे आहे" असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.चंद्रकांत पाटील यांनी याबाबत ट्विट करत, "मा. पवार साहेब, मला हे जाणून अत्यंत आनंद झाला आहे की, आपण आपला महत्त्वपूर्ण वेळ काढून मोदीविरोधी पक्षांचे नेतृत्व करणे स्वीकारले. तुम्ही अगदी योग्य म्हणालात, सध्याचा काळ तुम्हा सर्वांसाठी अंधारमय झालेला आहे आणि पुढील निवडणुकांमध्येही तुम्हाला विरोधी पक्षातच बसायचे आहे." असं म्हटलं आहे.

आदर्श लोकशाही कशी असावी हे मोदी सरकारच्या धोरणांकडे पाहून तुमच्या लक्षात आले असेल. लोकशाही कशी उभारली जाते आणि कशी नियंत्रणात ठेवली जाते, याचे उदाहरण जम्मू-काश्मीर आहे. तुम्हाला शक्य नसलेली प्रत्येक गोष्ट मोदी सरकारने अवघ्या ७ वर्षात करून दाखवली आहे असं पाटील यांनी म्हटले आहे.

सोबतच मोदी सरकारच्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. लाखो शेतकरी याचा लाभ घेत आहेत. जे तुम्हाला इतके वर्ष शेतकऱ्यांसाठी जे जमले नाही, ते मोदी सरकारने करून दाखवले. असं देखील पाटील यांनी म्हटले आहे.

राज्यातील मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर भयंकर पूरस्थिती ओढवली, ज्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले, मात्र अजूनही तुमच्या सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत केली नाही. त्यांना आश्वासन आणि दुर्लक्ष याशिवाय तुम्ही काय दिले? यावरून तुमचे शेतकऱ्यांवरील प्रेम दिसून येते, असं म्हणत त्यांनी राज्य सरकरवर निशाणा साधला.

Tags:    

Similar News