२०२४ च्या लोकसभेसाठी भाजपची 'ब्लू प्रिंट' तयार, मोदींच्या होणार १०० सभा
आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली 'ब्लू प्रिंट' तयार केली आहे. या 'ब्लू प्रिंट' नुसार भाजपने दक्षिणेतील राज्ये आणि ओडिशा-बंगालवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. भाजप २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नविन रणनीतीनुसार काम करणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप महिला आणि अल्पसंख्याकांची मते मोठ्याप्रमाणात मिळवण्याच्या तयारित असल्याची माहिती मॅक्स महाराष्ट्राला सुत्रांनी दिली आहे.;
आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारासाठी आणि त्यामध्ये बहुमताने विजयी होण्याच्या दिशेने भाजपने ( BJP ) जोरदार तयारीला सुरवात केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची 'ब्लू प्रिंट' भाजपने तयार ठेवली आहे. अशी माहिती भाजपच्या अंतर्गत सुत्रांनी मॅक्स महाराष्ट्राच्या हाती लागली आहे. ज्या राज्यामध्ये भाजपला आपली पाळेमुळे अधिक मजबूत करायची आहेत. त्या राज्यावर भाजपने आपले लक्ष केंद्रीय केले आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरपर्यत अशा राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळपास १०० मोठ्या सभा घेण्याचा निर्धार भाजपने केला आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या १०० सभेतून महिला आणि अल्पसंख्याक समाजापर्यत पोहचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दक्षिणेतील राज्य, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील १६० मतदारसंघाकडे भाजपचे ( BJP ) विशेष लक्ष असून त्याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या सभा घेवून प्रचार करण्यावर भर दिला जाणार आहे. २०२३ च्या सप्टेंबर महिन्यांपासून या सभांना सुरवात होणार आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपचा ( BJP ) फारसा प्रभाव नाही, त्याठिकाणी जनाधार मिळवण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे. ज्या ठिकाणी मोदी यांच्या सभा होणार आहेत. त्या राज्यात केंद्र सरकारकडून मोठ्या प्रकल्पाच्या घोषणा केल्या जातील, अशी आशा आहे. तसेच या अशा राज्यानां केंद्र सरकारकडून चांगला निधी देण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाने १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ६० लोकसभा मतदारसंघाची यादी तयार केली आहे. तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती राज्यात पोहचवण्यासाठी भाजपचा महिला मोर्चा तयार आहे. १० राज्ये आणि केंद्रशासित प्रद्रेशातील ६० लोकसभा मतदारसंघामध्ये ३० टक्क्यांहून अधिकची लोकसंख्या ही अल्पसंख्यांक समाजाची आहे आणि त्याकडे भाजपचे लक्ष आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J.P. Nadda) यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे धोरण ठरविण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. या तीन सदस्यीय समितीमध्ये सुनिल बन्सल (Sunil Bansal), विनोद तावडे (Vinod Tawde) आणि तरुण चुघ (Tarun Chugh) यांचा समावेश आहे. ही समिती भाजपच्या वेगवेगळ्या मोर्चा, विभाग आणि आमदार, खासदारांना नेमून देण्यात आलेले कार्यक्रम लोकांपर्यत पोहचवत आहेत की नाही यांचे निरिक्षण करुन त्याचा अहवाल वरिष्ठ नेत्यांना देण्याचे काम करणार आहे.
विविध मोर्चा आणि राज्यांकडून येणाऱ्या माहितीच्या आधारावर या कार्यक्रमात काही बदल, सुधार करायचे असल्यास तशा सूचना समिकडून दिल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J.P. Nadda) आणि इतर स्टार प्रचारकांच्या विविध कार्यक्रमात बदल करण्याच्या सूचना सुद्धा ही समिती देवू शकणार आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि मंत्र्यांना एका-एका राज्याचे प्रभारीपद देण्यात येणार आहे. या सर्व राज्यांवर देखरेख ठेवण्याचे काम ही तीन सदस्यीय समिती करणार आहे. विशेषत: दक्षिणेतील राज्ये, ओडिशा आणि पश्चिम बंगालवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या ( BJP ) सूत्रांनी मॅक्स महाराष्ट्राला दिली आहे.
मध्य प्रदेश राज्यात भाजपने आपली संघटना बळकट करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. येथील मतदारांवरील पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने भाजप प्रयत्नशील आहे. तर भाजपने तेलंगणा राज्यासाठी वेगळी रणनीती तयार केली आहे. त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील नेत्यांना वगळून इतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा भाजप या राज्यामध्ये आपले बस्तान बांधण्यासाठी आणि अधिक मजबूत करण्यासाठी वापर करणार आहे. एकीकडे हे प्रयत्न सुरु असताना केंद्र सरकार प्रशासनांच्या माध्यमातून सुद्धा इतर पैलूंवरही विचार करणार असल्याची माहिती भाजप ( BJP ) नेत्यांनी दिली आहे.
आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजप तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये अधिक जागा निवडून आणण्याच्या तयारित आहे. तसेच पूर्वेकडील ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांसाठी भाजपने वेगळी रणनिती तयार केली आहे. तर केरळसाठी यापेक्षाही वेगळी रणनीती अवलंबवणार असल्यामुळे भाजपला याचा लाभ मतदानाच्यावेळी होणार आहे, असा विश्वास भाजप नेत्यांना आहे. केरळचे हित साधण्यााचा पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांचा मानस असल्याचे मतदारांवर बिंबवण्याचा प्रयत्न या प्रचारादरम्यान करण्यात येणार आहे. तर काही नविन प्रकल्पाची घोषणा आणि भरघोस निधी केरळसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) घोषित करण्याची यावेळी शक्यता आहे.