नंदुरबार जिल्ह्यात भाजपची घराणेशाही, एकाच घरात जिल्ह्याची सत्ता
भाजपकडून काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र नंदुरबार जिल्ह्यात भाजपचीच घराणेशाही समोर आली आहे. नेमकी कशी ते जाणून घेण्यासाठी वाचा....;
काँग्रेस (Congress) घराणेशाही (nepotism) असलेला पक्ष असल्याचा आरोप भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापासून ते राज्यातील नेत्यांकडून केला जातो. मात्र नंदुरबार (Nandurbar)जिल्ह्यात आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Tribal Minister dr. Vijaykumar Gavit) यांच्या घरात जिल्ह्यातील महत्वाची पदं असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काँग्रेसवर घराणेशाहीची टीका करणाऱ्या भाजपमध्येही घराणेशाहीच असल्याचे समोर आले आहे.
राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीला धक्का देत भाजप सोबत सत्ता स्थापन केली. त्यापाठोपाठ आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे व शिंदे गटाच्या सदस्यांच्या मदतीने जिल्हापरिषदेत सत्तांतर घडवून आणले. यावेळी डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या सुप्रिया गावित (Dr.Supriya Gavit) यांच्या गळ्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ पडली. तसेच काँग्रेस पक्षाचे फुटीर नेते सुहास नाईक (Suhas Naik) यांच्या गळ्यात जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची माळ पडली.
कशी केली गोळाबेरीज? (calculation of election)
नंदुरबार जिल्हा परिषदेत एकूण ५६ सदस्य आहेत. त्यात काँग्रेसचे सर्वाधिक २४, भाजप २०, शिवसेना (Shivsena) आठ आणि राष्ट्रवादीचे(NCP) चार असे सदस्य आहेत. त्यामुळे सुरुवातीचे अडीच वर्षे नंदुरबार जिल्हा परिषदेची सत्ता काँग्रेस आणि शिवसेनेच्या ताब्यात होती. मात्र अडीच वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर पुन्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. यामध्ये भाजप 20, राष्ट्रवादी 4, शिवसेनेचे दोन आणि काँग्रेसच्या चार सदस्यांनी डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांना मतदान केले. त्यामुळे 31 मतांसह डॉ. सुप्रिया गावित अध्यक्ष तर सुहास नाईक हे उपाध्यक्ष म्हणून विजयी झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी (Seema Valavi) आणि उपाध्यक्ष राम रघुवंशी (Ram Raghuvanshi) यांचा सहा मतांनी पराभव झाला.
काँग्रेस आणि शिवसेनेने व्हीप (Shivsena whip) जारी करूनही सदस्य फुटल्याने त्यांच्यावर काय कारवाई होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच नंदुरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री के सी पाडवी (KC padavi) यांची काँग्रेसवरची पकड ढिली झाल्याचेही यावेळी स्पष्ट झाले.
डॉ. विजयकुमार गावित यांची घराणेशाही (Dr. Vijaykumar Gavit Nepotism)
डॉ. विजयकुमार गावित हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आदिवासी मंत्री आहेत. त्याबरोबरच त्यांची कन्या डॉ. हिना गावित या नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार तर दुसरी कन्या डॉ. सुप्रिया गावित यांच्याकडे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आहे. त्यामुळे नंदुरबारमध्ये जिल्ह्याची सत्ता आपल्याच घरात ठेवल्याने डॉ. विजयकुमार गावित यांची घराणेशाही समोर आली आहे.