भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. या भेटीनंतर मनसे-भाजपची युती होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज ठाकरे यांनी आपल्यालाही भेटण्यासाठी फोन केला होता. त्यामुळे आपण त्यांना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. ज्या पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आणि भूमिका मान्य आहे, त्या पक्षासोबत भाजपची युती होऊ शकते, पण मनसेसोबत युतीचा कोणताही विचार सध्या नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. पण देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी युती होत असते, त्यामुळे भविष्यात मनसेसोबत युती होऊ शकते असे संकेतही त्यांनी दिले आहेत.