'भाजप – मनसे युतीचा कोणताच प्रस्ताव नाही'; चंद्रकांत पाटील यांचा खुलासा
भाजपा – मनसेची युती होणार का? याबाबत मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. याबाबत बोलतांना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी असा कोणताही प्रस्ताव सध्या नसल्याचे स्पष्ट केले.;
मुंबई // भाजपा – मनसेची युती होणार का? याबाबत मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. त्यातच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान त्यांच्या या भेटीनंतर चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलतांना भाजप-मनसे युतीचा सध्या तरी कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान केवळ दोन हिंदू चहा पिण्यासाठी एकत्र आल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांच्यासोबत नाशिकमध्ये अचानक भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी मुंबईत घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. म्हणून ही केवळ चहापाण्यासाठीची भेट होती असं पाटील यांनी म्हटलं आहे. या भेटी दरम्यान राजकीय चर्चा झाली. मात्र, भाजप- मनसे युतीचा कोणताही प्रस्ताव या बैठकीत नव्हता. एकमेकांचे विचार जाणून घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करतांना त्यांनी त्यांच्या उत्तर भारतीय विरोधी भुमिकेबद्दल विचार करावा अशी विनंती मी त्यांना केल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.
याबाबत बोलतांना मी उत्तर भारतीयांच्या विरोधात नसल्याचे त्यांनी मला सांगितले आहे मात्र, त्यांच्या वागण्यातून देखील जनतेने त्या गोष्टी दिसायला हव्यात असं पाटील यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांचे काही मुद्दे हे नक्कीच राज्याच्या हिताचे आहेत त्यामुळे त्यांनी त्या मुद्द्यांना पुढे घेऊन जाण्याची विनंती मी केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, राज ठाकरे हे त्यांच्या पक्षाची विचारधारेबाबत निर्णय घ्यायला समर्थ आहेत. त्यांना एखादी गोष्ट सांगण्याएवढा मी मोठा नाही मी केवळ त्यांना विनंती केली आहे असं पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी महापालिकेत निवडून दाखवावं
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिका क्षेत्रातील एखादा सुरक्षित वॉर्ड बघून निवडून दाखवावं, इतरांच्या क्षमता बघण्यापेक्षा स्वत:ची क्षमता त्यांनी ओळखावी असं पाटील यांनी म्हटलं आहे.