मुंबई बँक निवडणुकीत प्रवीण दरेकर यांचा मोठा विजय

Update: 2022-01-03 07:17 GMT

मुंबई बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत मजूर प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे प्रवीण दरेकर अडचणीत आले होते. पण आता प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलने बँकेच्या निवडणुकीत मोठे यश मिळवले आहे. दरेकर यांच्या सहकार पॅनेलने बँकेच्या सर्वच्या सर्व २१ जागा जिंकल्या आहेत. यातील १७ जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या, पण काहींच्या हट्टामुळे ४ जागांवर निवडणूक झाली, असे सांगत प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर टीका केली आहे. मध्यवर्ती ग्राहक मतदारसंघातून विठ्ठल भोसले, प्राथमिक ग्राहक मतदारसंघातून पुरुषोत्तम दळवी, महिला सहकारी संस्था मतदार संघातून जयश्री पांचाळ आणि भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघातून अनिल गजरे हे विजयी झाले आहेत.

या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित उमेदवार होते. मजूर प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने प्रवीण दरेकर यांना विरोधकांनी लक्ष्य केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून प्रवीण दरेकर हे बँकेचे अध्यक्ष आहेत आणि ते मजूर या प्रवर्गातूनच निवडून येत आहेत. पण या सहकारी संस्थेमधील मजुरांच्या व्याखेनुसार ती व्यक्ती अंगमेहनतीचे काम करणारी असली पाहिजे. त्यामुळे प्रवीण दरेकर कोणत्या अर्थाने मजूर वर्गात येतात, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. याबाबत सहकार विभागानेही दरेकर यांना नोटीस पाठवली होती. तर नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला होता.

Full View

Tags:    

Similar News