"पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांची चौकशी करा" भाजप आमदाराची मागणी

Update: 2022-09-20 13:49 GMT

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ प्रकरणात EDच्या कोठडीत आहेत. त्यांना पुन्हा एकदा १४ दिवसांची कोठडी देण्यात आल्याने त्यांचा मुक्काम वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक धक्कादायक मागणी केली आहे. पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करा, अशी मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्याने तशा मागणीचे पत्रच पृहमंत्र्यांना पाठवले आहे.

अतुल भातखळकर यांच्या या आरोपामुळे राज्याचे राजकारण आता तापण्याची शक्यता आहे. "मराठी माणसाला बेघऱ करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरुआशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी" अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

एवढेच नाही तर भातखळकर यांनी तत्कालीन गृहनिर्माण सचिवांच्या पत्राचा हवाला देत म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता आणि त्यामुळे या चौकशीच्या प्रकरणाचे धागेद्वारे हे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुखांपर्यंत जात आहेत, असा आरोप केला आहे.

दरम्यान भातखळकर यांच्या या मागणीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना भातखळकर यांच्याकडे पुरावे असल्याशिवाय ते आरोप कऱणार नाहीत, त्यामुळे यावर गृहमंत्री घेतील अशी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे या मागणीला भाजपचा पाठिंबा आहे का अशीही चर्चा सुरू झाली आहे.

Tags:    

Similar News