विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजपचे नेते मोहीत कंबोज यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचा एक बडा नेता लवकरच अनिल देशमुख, नवाब मलिक यांना भेटणार असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. याचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनातही उमटले. अधिवेशनाच्या एक दिवस आधी असे ट्विट करुन विरोधकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, पण त्याला आम्ही घाबरणार नाही, असे उत्तर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिले आहे.