प्रताप सरनाईक यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांची बोचरी टीका
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटी रूपयांचा दावा दाखल केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांना प्रतिउत्तर देत बोचरी टीका केली आहे.
विरोधकांवर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांचा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अब्रु नुकसानीचा खटला दाखल केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोमय्या यांच्यावर खटला दाखल होताच किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्यावर सरसंधान साधलं आहे.
'या तर चोराच्या उलट्या बोंबा' असं म्हणत सोमय्या यांनी आमदार सरनाईक यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. सरनाईक यांनी NSEL घोटाळ्यातून टिटवाळा येथे 78 एकर जमीन घेतली, ती जमीन जप्त करण्यात आली आहे. आत्ता तुमची ईडीमार्फत चौकशी करण्यात आली आहे. 100 कोटींच्या धमक्यांना आम्ही घाबरणार, थांबणार नाही असं म्हणत सोमय्या यांनी सरनाईक यांच्यावर पलटवार केला आहे.
किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध ठाण्याच्या कोर्टात 100 कोटी रुपयांच्या अब्रु नुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. "निराधार, बेछूट आणि बेजबाबदार आरोप करून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची बदनामी करण्याची मोहीम माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गेले काही महिने सुरु केली होती. किरीट सोमय्या यांनी खोट्या विधानांबाबत माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार" असे आमदार सरनाईक यांनी जाहीर केले होते. त्यानुसार किरीट सोमय्या यांच्या विरोधात ठाणे कोर्टात 100 कोटींचा विशेष दिवाणी दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल केला आहे.
आता प्रकरणावरून आ.सरनाईक आणि मा.खा.सोमय्या यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. खटला दाखल झाल्याने आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या न्यायालयात काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.