तिघाडी मिळून, सरकार चालवताय की दाऊदची गँग? आशिष शेलार यांचा घणाघात
भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ट्वीटच्या माध्यमातून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तिघाडी मिळून, सरकार चालवताय की दाऊदची गँग? असं शेलार यांनी म्हटलं आहे.
मुंबई : भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आ.आशिष शेलार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "अनिल देशमुख प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्तांनीच चक्क सीबीआयच्या अधिकाऱ्याला धमकावले. राज्यात फक्त आणि फक्त काय"द्यायचे" राज्य आहे का? तिघाडी मिळून, सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय? असं ट्विट आ. शेलार यांनी केलं आहे.
सोबतच शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये "सरकार विरोधात लिहिले म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडला , मंत्र्यांना प्रश्न विचारले तर ठाण्याच्या करमुसे सारख्यांना जीव जाईपर्यंत मारले, आमदारांनी विधानसभेत ओबीसी विषयावर खडा सवाल केला तर आमदांना निलंबित केले". असं म्हणते आ. आशिष शेलार यांनी सरकारची दंडेलशाही सुरू असल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान शिवसेना खा. संजय राऊत यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात केलेल्या विविध दौऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भाजप शासित राज्यातील राज्यपाल राज्यात गावदौरे करत नाहीत मात्र, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये राज्यपालांचे दौरे होतात असं खा.राऊत यांनी म्हटलं होते. यावर भाष्य करतांना आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, "मा. राज्यपाल आणि विरोधीपक्ष नेते अडचणीत असलेल्या जनतेला भेटायला गेले तर सरकारच्या पोटात कळ येते." माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप असलेल्या पोलीस बदल्या भ्रष्टाचार प्रकरणातील कागदपत्रे सीबीआयला राज्य सरकार देत नाही. न्यायालयाचे आदेशही मानत नाहीत." असं शेलार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आ.आशिष शेलार यांनी ट्विट मागून ट्विट करत सरकारच्या कार्यप्रणालीवर जोरदार निशाणा साधल्याने राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं पाहायला मिळत आहे. दरम्यान आता सत्ताधाऱ्यांकडून आशिष शेलार यांच्या या ट्विट ला काय उत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.