भाजपचा नैतिकतेचा आव खोटा आहे का?

पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती, पण त्याच भाजपच्या सरकारमध्ये आता ते मंत्री झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या नैतिकतेच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.;

Update: 2022-08-09 15:06 GMT

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये एका तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी राजीनामा द्यावा लागलेले मंत्री संजय राठोड....याच संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जीवाचे रान केले होते. अखेर ठाकरेंना राठोड यांचा राजीनामा घ्याला लागला. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सामील झालेल्या संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद बहाल करण्यात आले आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या या निर्णय़ावर चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांना मंत्रीपद देण्याचा निर्णय़ दुर्दैवी आहे, पण आपण लढा सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

एकीकडे चित्रा वाघ संतापल्या आहेत, तर विरोधकांनीही भाजपसह चित्रा वाघ यांना डिवचण्याची संधी सोडलेली नाही. राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना जाणीवपूर्वक डावलले गेले आहे, अशी टीका माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. तर शिंदे-फडणवीस सरकारचे हे 'व्हाईट वॉश' मंत्रीमंडळ आहे का ? असा खोचक प्रश्नही यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे. तर सुप्रिया सुळे यांनीही ज्या संजय राठोडांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला त्यांनाच मंत्रीपद दिले, असा टोला लगावला आहे.

संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळाल्याने त्यांच्या मतदारसंघात आणि बंजारा समाजात जल्लोष सुरू आहे. पण ज्या भाजपसोबत शिंदे गटातील संजय राठोड सत्तेत सहभागी झाले आहेत, त्या भाजपचा नैतिकतेचा आव खोटा आहे का, असा प्रश्नच चित्रा वाघ यांच्या भूमिकेमुळे निर्माण झाला आहे का?


Full View

Tags:    

Similar News