औरंगाबादमध्ये कॉंग्रेस भाजपमध्ये राडा, उपसभापतीला कॉंग्रेस सदस्यांची मारहाण

अर्जुन शेळके यांनी काही दिवसांपुर्वीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर ४ दिवसांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत केवळ एका मताच्या फरकाने उपसभापती म्हणून अर्जुन शेळके निवडून आले. यामुळे पराभुत झालेल्या कॉंग्रेस सदस्यांनी शेळके यांना मारहाण केली.

Update: 2021-08-02 15:47 GMT

 औरंगाबाद पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि भाजप सदस्यांमध्ये नुकत्याच झालेल्या उपसभापती निवडणुकीच्या पार्शभूमीवर राडा झाला. काँग्रेसला राम राम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करत पंचायत समितीचे उपसभापती झालेले अर्जुन शेळके यांना त्यांच्याच दालनात मारहाण झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. काँग्रेसच्या दोन पंचायत समिती सदस्यांसह सात ते आठ कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याची माहिती भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी सांगितली.

अर्जुन शेळके यांनी काही दिवसांपुर्वीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर ४ दिवसांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत केवळ एका मताच्या फरकाने उपसभापती म्हणून अर्जुन शेळके निवडून आले. यामुळे निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.

२९ जुलै रोजी औरंगाबाद पंचायत समितीच्या कार्यालयात झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अनुराग शिंदे यांना ९ मते तर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अर्जुन शेळके यांना १० मते मिळाली. यानंतर सोमवारी दुपारी नूतन उपसभापती अर्जुन शेळके यांच्या दालनात काँग्रेसचे दोन सदस्य आणि सात ते आठ जण आले. अचानक त्यांनी अर्जुन शेळके यांच्यावर हल्ला केला. दालनातील खुर्च्या, टेबल्सची देखील तोडफोड केली. दालनाच्या खिडक्यांची तोडफोड केली. या मारहाणीत शेळके यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे.

या घटनेची कठोर शब्दात निंदा करत, "पराभूत झालेल्या उमेदवाराने मारहाण केल्याची ही पहिलीच घटना असेल. माणुसकीच्या नात्याने अर्जुन शेळके यांनी काँग्रेस सदस्यांना दालनात बसण्यास खुर्च्या दिल्या होत्या. क्षणातच त्यांनी शेळके यांना मारहाण करायला सुरुवात केली. काँग्रेसमधील लोकांनी आता तरी समजून घ्यावे. यामुळेच संपूर्ण देशात काँग्रेसची पडझड होत आहे. अर्जुन शेळके यांनी आता स्वतःचा इलाज करावा नंतर हल्लेखोरांचा इलाज करू" अशा शब्दात भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी वक्तव्य केलं.

Tags:    

Similar News