भाजप आणि शिंदे गटाचा लोकसभेसाठी फॉर्म्यूला ठरला, देवेंद्र फडणवीस यांची माहिती
पुण्यात झालेल्या सभेवेळी अमित शहा यांनी शिवसेनेचा उल्लेख केला नसल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत भाजप आणि शिंदे गटाचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला असल्याचे म्हटले आहे.;
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपकडून मित्रपक्ष एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला संपवले जाईल, अशी चर्चा रंगली आहे. त्यातच पुण्यातील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भाजपचे खासदार निवडून येतील, असं म्हटलं होतं. त्यावरून चर्चा रंगल्या असतानाच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टीकरण दिले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमित शहा यांनी स्पेसिफिक शिवसेनेचा उल्लेख केला नाही. मात्र एनडीएतून (NDA) खासदार निवडून येतील, असा उल्लेख केला. त्यामुळे शिंदे गटाला टाळण्याचा प्रयत्न होत असल्याच्या वावड्या उडवू नयेत. फक्त कसबा (Kasaba peth) आणि चिंचवडच (Chinchwad) नाही तर लोकसभेच्या जागांबाबतही भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचा फॉर्म्युला ठरला आहे. तो योग्य वेळी जाहीर करू, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमित शहांचा उल्लेख शत्रू असा केला होता. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, फडणवीस म्हणाले, उध्दव ठाकरे अमित शहा यांना शत्रू मानत असतील. मात्र आम्ही शिवसेनेला शत्रू नाही तर वैचारिक विरोधक मानतो.