राष्ट्रवादीचा बडा नेता तुरूंगात जाणार, सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करत मोहित कुंबोज यांचे सूचक ट्वीट
ट्वीट सेव करा असं म्हणत भाजपचे नेते मोहित कुंबोज यांनी राष्ट्रवादीचा बडा नेता तुरूंगात जाणार असल्याचं ट्वीट केल्याने चर्चांना उधाण आले आहे.;
भाजपचे नेते मोहित कुंबोज यांनी ट्वीट करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या ट्वीटमध्ये मोहित कुंबोज यांनी राष्ट्रवादीचा बडा नेता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटण्यासाठी तुरूंगात जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचा बडा नेता कोण? अशी चर्चा रंगली आहे.
मोहित कुंबोज यांनी तीन ट्वीट केले आहेत. त्यापैकी पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचा मोठा नेता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना तुरूंगात भेटणार आहे, म्हणत ट्वीट सेव्ह करा, असं म्हटलं आहे.
दुसऱ्या ट्वीटमध्ये मोहित कुंबोज यांनी 2019 मध्ये तात्कालिन पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी बंद केलेल्या जलसिंचन घोटाळ्याचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर यामध्ये सीएमओ सोबतच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.
पुढे तिसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी लवकरच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार आहे. त्यामध्ये त्या नेत्याची भारत आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, गर्लफ्रेंडच्या नावावरील मालमत्ता, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, त्या नेत्याचे कौटूंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी पत्रकार परिषदेत मांडणार आहे. तसंच आता वेळ पहा असही या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
सिंचन घोटाळ्यात आरोप कुणावर?
2012 मध्ये सिंचन घोटाळा प्रकरणी राज्याचे तात्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांच्यावर भाजपचे विरोधी बाकावरील नेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले होते. तर हा घोटाळा 70 हजार कोटी रुपयांचा असल्याचे म्हटले होते. या घोटाळ्यात अजित पवार, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यावर आरोप करण्यात येत होते. मात्र 26 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या दोन दिवसानंतर क्लीनचीट देण्यात आली. तर 2019 मध्ये एसीबीचे तात्कालिन पोलिस महासंचालक परमबीर सिंह यांनी ज्या प्रकरणांमध्ये अजित पवार यांचा थेट संबंध नाही अशा प्रकरणांची चौकशी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे याच प्रकरणांचा संदर्भ देत मोहित कुंबोज यांनी ट्वीट केले आहे.
मोहित कुंबोज यांच्या निशाण्यावर कोण?
सिंचन घोटाळ्यात अजित पवार, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यावर आरोप करण्यात येत होते. मात्र या आरोपांच्या केंद्रस्थानी अजित पवार हेच होते. त्यामुळे मोहित कुंबोज यांच्या निशाण्यावर अजित पवार, सुनिल तटकरे की आणखी कोण? याविषयी चर्चांना उधाण आलं आहे.