पंजाब सरकारचा मोठा निर्णय ; 36 हजार कॉन्ट्रॅक्चुअल कर्मचाऱ्यांना केले कायम
चंदीगढ : पंजाब सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर जनतेला मोठे गिफ्ट दिले आहे. पंजाब सरकारच्या विविध विभागात अस्थाई स्वरुपात जे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांना नोकरीत कायम करण्याचा निर्णय चन्नी सरकारने घेतला आहे. पंजाब सरकारचा हा एक अतिशय मोठा निर्णय असून, याचा फायदा पंजाबमधील जवळपास 36,000 कर्मचाऱ्यांना होणार आहे.
मुखमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाब प्रोटेक्शन अॅण्ड रेगुलराइजेशन ऑफ कॉन्ट्रॅक्चुअल एम्प्लॉइज बिल-2021 हे यासाठी पास करण्यात आले. आता हे विधेयक मान्यतेसाठी विधानसेभेत सादर करण्यात येईल.
दरम्यान या निर्णयाबद्दल बोलताना मुख्यमंत्री चन्नी म्हणाले की, ही एक चांगली योजना आहे. या योजनेतंर्गत ज्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या विविध भागात दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा दिली आहे. त्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आली आहे. किमान वेतनामध्ये 415.89 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पंजाबमध्ये किमान वेतन हे 8776.83 रुपये इतके आहे. आता त्यामध्ये वाढ करून ते, 9192.72 रुपये करण्यात आले आहे.