अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघातील वाडेगव्हाण येथे 7 कोटी 79 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी बोलताना मराठा,ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला, हे आरक्षण प्रकरण आता आलं, एखाद्या केसचे साक्षी , पुरावे कधी घेतले याला महत्व असते , निकाल कधी लागला हा मुद्दा नंतर येतो, तेव्हा मराठा, ओबीसी आरक्षण हा मुद्दा भाजप सत्तेत असतानाचा आहे त्याचा निकाल आमच्या काळात लागला तरी दोषी आम्हीच कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान ईडी आणि सीबीआयच्या कारवाईबाबत पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाले की ईडी आणि सीबीआय फक्त महाराष्ट्रात काम करते की काय? असं आम्हाला वाटू लागलं आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी खालच्या पातळीला जाऊन राजकारण करण्याचं काम भाजप करत असल्याचे ते म्हणाले.
सोबतच माझ्या जुन्या सहकाऱ्यांना मी नेहमी सांगायची काहीही करा पवारांचा नाद करू नका , शेवटी त्यांनी नाद केला आणि काय झालं ते राज्याने पाहिले असं म्हणत त्यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.'होत्याचे नव्हते, नव्हत्याचे होते' ही म्हण मराठीत प्रचलित आहे ती पवार साहेबांनी खरी करून दाखवली आम्ही निवडून आलो तेंव्हा आम्हाला वाटलं पण नव्हतं आम्ही मंत्री होऊ मात्र पवार साहेबांनी ते करून दाखवलं. 'होत्याचे नव्हते, नव्हत्याचे होते' करण्याची ताकद फक्त पवार साहेबांमध्ये असं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले.
सोबतच ते म्हणाले की, माझ्या नावा मागे आडनाव वजनदार लागलं आहे, नाहीतर संघर्ष आणि आमदार निलेश लंके यांचा संघर्ष सारखाच आहे. संघर्ष करणारी माणस एकत्र आली की अभिमान वाटतो. अशा संघर्षातून लोकमान्यता मिळाली म्हणून तुम्हाला नेते म्हणतात. आता तुम्ही नेते झालात तर तुमची जबाबदारी देखील वाढली आहे असं मुंडे म्हणाले. सोबतच माझ्या घरातल्या व्यक्तीला जे कळालं नाही ते पवार साहेबांना त्यावेळी कळलं म्हणून त्यांनी मला विधानसभा विरोधी पक्षनेते केले होते. असे ते म्हणाले.18 पगड जातीतील लोकांना एकत्र घेऊन त्यांनी काम केलं आणि खऱ्या लोकशाहीची ओळख जगाला करून दिली असं मुंडे म्हणाले.