भारत जोडो, नव्या भारताच्या उभारणीचा मंत्र : ॲड. यशोमती ठाकूर

Update: 2022-11-07 07:28 GMT

राजकारणी माणसाने राजकारण करावं, हे देश जोडण्यासाठी इतकं कशाला चालायला पाहिजे? निवडणुका लढवाव्यात, सभा कराव्यात, उमेदवार उभे करावेत, झंझावाती दौरे-भाषणं करावीत, सत्ता मिळवावी, सत्ता उपभोगावी.. पण हे सगळं सोडून राहुलजी कन्याकुमारी ते कश्मिर पदयात्रेला निघालेत. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीवादी पक्षाच्या नेत्याला आज रस्त्यावर चालावसं वाटतंय यावर देशभर बरीच चर्चा सुरू आहे. देशात मोदी सरकार आल्यानंतर लोकशाही मूल्यांचा संकोच सुरू आहे, अशा वेळी याला राजकीय उत्तर देण्याबरोबरच लोकशाही वाचवणे हे आद्य कर्तव्य मानून राहुल गांधी यांनी पदयात्रा सुरू केली. भारत जोडो असं या पदयात्रेला नाव दिलं गेलं. आज भारत जोडो हा नव्या भारताच्या उभारणीचा मंत्र झाला आहे.

भारत जोडो ची गरज का यावर बराच उहापोह सुरू आहे. देशातील मुख्यप्रवाहातील माध्यमांना अजूनही देशातील जनतेच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज बांधता आलेला नसल्याने त्यांनी पहिल्यापासूनच या यात्रेची हेटाळणी सुरू केली होती. ही यात्रा कुठल्या जात-धर्म-पंथासाठी नाही तर भारतासाठी आहे. कुठल्याही राजकारणासाठी नाही, याचमुळे दिवस-रात्र हिंदू-मुसलमान अजेंडा मध्ये अडकलेल्या माध्यमांना या यात्रेमध्ये बिल्कुल रस नाही. मात्र, जनतेची ताकत ही कुठल्याही माध्यम-समाजमाध्यमापेक्षा मोठी असते. आज लाखों लोकं या यात्रेत चालतायत. कुठलाही स्वार्थ नाही. ज्यांना या देशावर प्रेम आहे ते या यात्रेत आहेत. त्याचमुळे जात-धर्माच्या नावावर ज्यांना राजकारण करायचं आहे अशा पक्ष आणि प्रवृत्तींचे धाबे दणाणले आहेत. या देशातील लहान मोठ्या जाती धर्मांमध्ये बंधुत्वाचं वातावरण असावं, सौहार्द असावा यासाठी भारताने धर्मनिरपेक्षता स्वीकारली.

याच जोरावर भारताने आज जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीकोनातून वाटचाल सुरू केली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाची अर्थव्यवस्था कोलमडली होती, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, मूल्यव्यवस्था, औद्योगिकीकरण, शेती, विज्ञान-तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रात तळाला असलेला हा देश गांधी-नेहरू-पटेल-आंबेडकर यांच्यासोबतच अगणित द्रष्ट्या नेत्यांच्या मेहनतीने विकासाच्या रूळावर आला. विकासाला मानवीय चेहरा असायला हवा याच एका तत्वावर भारताच्या विकासाची रचना केली गेली. सगळ्यांचे हात या विकासाला लागले पाहिजेत या विचारावर भारत उभा राहिला. आज नेमकी उलट परिस्थिती आपल्याला दिसतेय.

आज देशात ध्रुवीकरण सुरू आहे. सातत्याने लोकांना घाबरवलं जात आहे. कधी हिंदू खतरे में है, कधी मुस्लीमांचा द्वेष, कधी कुठल्या ठराविक विचारसरणी-जाती-धर्माच्या लोकांना देशद्रोही ठरवणे अशा गोष्टी सुरू आहेत. राजकीय विरोधकांना शत्रू घोषित करणे, विरोधक मुक्त भारत हा असंवैधानिक नारा देणे, हिंदू राष्ट्राची स्वप्ने दाखवून आपले राजकीय हित साधणे या अजेंड्यावर भारतीय जनता पक्षाची वाटचाल सुरू आहे. रोज एकमेकांना शत्रू म्हणून लढवत ठेवणे, माध्यमांचा एककल्ली वापर करणे- माध्यमांना विकत घेणे, विरोधी पक्षच सर्व ऱ्हासासाठी जबाबदार आहे, सर्व गोष्टींना पं. नेहरू जबाबदार आहेत, गांधींना प्रातःस्मरणीय म्हणून नथुराम गोडसेचा सन्मान करायचा असा हा सगळा अजेंडा आहे. बुद्धीभेद करून लोकांना संभ्रमात टाकणे हे भारतीय जनता पक्षाचे मोठे हत्यार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात ठोस भूमिका घेणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने राजकारण करून पटेल-नेहरू वाद कसे होते याचं एक चित्र रंगवले जात आहे. मात्र खरा इतिहास हाच आहे की, भाजपा आणि संघ परिवार केवळ प्रतिके आणि प्रतिमा पळवत आहे. लोकांच्या भावनांशी खेळत आहे. या नेत्यांच्या विचारांशी भाजपाला काहीही देणं-घेणं नाही. इवेन्टजीवी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या जाहीरात कंपन्यांनी मोदींचे मार्केटींग केले आहे, ब्रँडींग केले आहे. यामुळे आयडीया ऑफ इंडियाची खरी संकल्पनाच मागे पडली आहे.

आज ही आयडीया ऑफ इंडिया ची संकल्पना लोकांपर्यंत घेऊन जायची वेळ आहे. माध्यमं-समाज माध्यमं यावर भारतीय जनता पक्षाचा पगडा आहे. ठराविक उद्योगपतींच्या हातात सगळया देशाचा कारभार आहे. अशा वेळी सामान्य लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या तरी त्या ऐकल्या जात नाहीत, त्यांची सुनावणी होत नाही. सर्व संस्था या सरकारी अजेंड्याच्या गुलाम असल्यासारख्या वागतायत. त्यांच्या स्वायत्ततेवर प्रश्न निर्माण होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी एक सगळ्यात मोठं न्यायालय आहे, ज्याचा दरवाजा ठोठावण्याची गरज होती, ते म्हणजे जनतेचं न्यायालय.

आज राहुल गांधी जनतेच्या न्यायालयात आहेत. ते लोकांना भेटतायत, बोलतायत. त्यांचा जोश- उत्साह बघून अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या बद्दल पसरवले गेलेले सगळे भ्रम आता तुटू लागलेयत. या देशाने राहुल गांधींच्या सोबत अन्याय केला आहे. तो अन्याय दूर करा अशी माझी मागणी नाही, लोक आपोआपच आपला खरा नेता निवडतील. जाहिरातबाजीतून निर्माण झालेला नेता या देशाने दोन वेळा निवडला. आता देशाला खरी दिशा देणारा नेता लोकांच्या समोर-लोकांमध्ये आहे. देशाची अर्थव्यवस्था, कोविड या सगळ्या काळात राहुल गांधी यांनी सरकारला वेळोवेळी मार्गदर्शन केले, मात्र या सरकारने राहुलजी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह जी यांचा वेळोवेळी अपमान केला. या देशाच्या हितासाठी सर्व हल्ले-सर्व अपमान आम्ही स्विकारायला तयार आहोत. राहुलजींचे ऐकलं असतं तर आज कोविडची स्थिती चांगल्या प्रकारे हाताळता आली असती, हे जगाने मान्य केले आहे.

आज देशाची अर्थव्यवस्था रसातळाला आहे, मात्र मोठमोठे इवेन्ट-जाहिरातबाजी यांनी लोकांना दिपवून टाकलेले आहे. लोकांच्या पैशाचा अपव्यय सुरु आहे. कोणी विरोधात आवाज उठवला तर केंद्रीय एजन्सींचा वापर केला जात आहे. देशात अभूतपूर्व अशी दहशत पसरवण्यात आली आहे. अखंड भारताचं स्वप्न दाखवून भारत खंड-खंड केला जात आहे, हिंदू राष्ट्राची स्वप्ने दाखवून देशात हिंदू-मुस्लीम तनाव निर्माण केला जात आहे, परिवारवादाच्या विरोधात लढाई सांगून देशात हुकूमशाही आणली जात आहे. काँग्रेसमुक्त भारत, गांधीमुक्त काँग्रेस असे नारे दिले जात आहेत. पण काँग्रेस या देशाचा डीएनए आहे. या देशाच्या रक्तातून काँग्रेस काढता येणार नाही. काँग्रेस हा दीनदुबळ्या-वंचित-शोषित, गरिबाचा आवाज आहे, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणाऱ्या जनतेचा आवाज आहे, काँग्रेस शिक्षणाचा आवाज आहे, काँग्रेस प्रगतीचा आवाज आहे.. काँग्रेस दूरदृष्टीचं नाव आहे. काँग्रेस हा शांततेचा भाव आहे... आज देशात निर्माण झालेल्या अस्थिरतेवर काँग्रेस शिवाय दुसरा उपाय नाही... काँग्रेस आपल्या विरोधकांना शत्रू मानत नाही, काँग्रेस कुणाला संपवण्यावर विश्वास ठेवत नाही. काँग्रेस म्हणजे नव्या भारताचा विश्वास आहे. आज भारत जोडो यात्रा हा विश्वास वृद्धींगत करत आहे.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येत आहे, इथून पुढे ती उत्तर भारतात सरकेल. दक्षिणेत भारत जोडो ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. लोकं स्वयंस्फूर्तीने सामिल होत गेली आणि जनसागर उसळला. उत्तरेत या यात्रेला आणखी प्रतिसाद मिळेल. दिल्लीत बसलेल्या नरेंद्र मोदी यांचे काऊंटडाऊन या यात्रेने सुरू केले आहे. असं असलं तरी ही यात्रा राजकीय बदलासाठी नाही, तर या देशॉच्या अखंडतेच्या संरक्षणासाठी, आयडीया ऑफ इंडियाच्या रक्षणासाठी आहे. या नव्या भारतासाठी एक होऊया... भारत जोडायचा आहे, तोडणाऱ्या शक्तींना हा संदेश देऊयात.

--------

लेखिका या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या असून महाराष्ट्र राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री आहेत.

Tags:    

Similar News