विधानसभा प्रचाराच्या प्रत्येकी रात्री नानांचा मला फोन यायचा, देवेंद्र फडणवीस यांनी केला गौप्यस्फोट
विधानसभा निवडणूकांच्या काळात दररोज रात्री नाना मला फोन करायचे आणि सल्ला द्यायचे, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.;
राज्यात विधानसभा निवडणूकांचा काळ सुरु होता. त्यात देवेंद्र फडणवीस हे आपल्या शैलीने विरोधकांवर तुटून पडायचे. मात्र या कालावधीत दररोज रात्री नाना पाटेकर फोन करुन सल्ला द्यायचे, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस भाषण करताना वरचा स्वर लावायचे. मात्र हा स्वर लावल्यानंतर दररोज रात्री नाना पाटेकर फोन करून, अरे बाबा किती जोराने बोलतोस. जरा श्वास घेऊन शांतपणे बोलत जा, असा सल्ला द्यायचे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी हे घडलं होतं असं म्हणून संपुर्ण किस्सा सांगितला. ते लोकमतने आयोजित केलेल्या महामुलाखतीत बोलत होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्या भाषणातील आवाजाची तीव्रता कमी होण्याचे 100 टक्के श्रेय नाना पाटेकर यांना जाते. मी या मंचावरून जाहीरपणे सांगतो की, विधानसभा निवडणूकीच्या काळात प्रत्येक भाषणानंतर रात्री नाना पाटेकर यांचा मला फोन यायचा आणि अरे किती जोराने बोलतोस, जरा श्वास घेऊन शांतपणे बोलत जा. त्यावेळी मी नानांना सांगायचो की, पुढचं भाषण बघा, त्यावेळी मी असं बोलणार नाही. पण पुढच्या भाषणातही मी तसाच बोलायचो. तेव्हा पुन्हा नाना पाटेकर यांचा फोन यायचा. त्यामुळे मी हळुहळू बदल करत गेलो आणि माझ्या आवाजाची तीव्रता कमी केली. याचं श्रेय नाना पाटेकर यांना जात असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.