महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला, बोम्मई-फडणवीस भिडले

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील गावांपाठोपाठ सोलापुर आणि अक्कलकोटवर दावा केला आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आमने-सामने आले आहेत.;

Update: 2022-11-25 06:36 GMT

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर (Maharashtra karnatak Border Dispute) सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavraj Bommoi) यांनी जत तालुक्यातील 65 गावं कर्नाटकमध्ये समाविष्ट करण्याचा विचार करत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकला देणार नाही. याऊलट बेळगाव, निपानी, धारवाडसह सीमाभागातील सर्व गावं महाराष्ट्रात परत आणणार असल्याचे म्हटले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा महाराष्ट्राला डिवचले. त्यामध्ये बसवराज बोम्मई म्हणाले की, जत तालुक्यातील गावंच नाही तर सोलापूर आणि अक्कलकोटही कर्नाटकमध्ये आणणार. त्याबरोबरच बसवराज बोम्मई यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. बसवराज बोम्मई म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं. मात्र त्यांचे स्वप्न कधीच पुर्ण होणार नाही.

बसवराज बोम्मई यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर फडणवीस यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काहीही दावा केला तरी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकमध्ये जाणार नाही. याऊलट आमचा सीमाभाग आम्हाला मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. सीमाप्रश्नासंदर्भात आमची भूमिका ठाम आहे. आमची मागणी घेऊन आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणीही मोठं नसल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली भूमिका

कर्नाटकला एक इंचही जमीन देणार नाही. सीमाप्रश्नासाठी मी एक महिना कर्नाटकमध्ये तुरुंगवास भोगला आहे. जतचा मुद्दा आताचा नाही तर हा मुद्दा 2012 चा आहे. त्यावेळी राज्यात कुणाचं सरकार होतं? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

शरद पवार यांचा बोम्मईंना टोला

बेळगाव, निपाणी, कारवार भाग सोडणार असतील तर काय देता येईल? यावर विचार करता येईल. पण काहीही न सोडता कशाचीही मागणी करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही, असा टोला शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना लगावला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोलले आहेत का?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अंगात भूत संचारलं आहे. ते त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोलले आहेत का? असा सवाल शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले.

सीमावादावर राज्यातील 48 खासदारांनी संसदेत केंद्र सरकारचे लक्ष वेधावे. तसेच सीमावाद सोडवण्यासाठी संसदेत आवाज उठवावा, असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

Tags:    

Similar News