शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे तीन चिन्ह सादर, वाचा काय आहेत पर्याय

सोमवारी शिंदे गटाने सादर केलेले तीनही चिन्ह नाकारल्यानंतर मंगळवारी शिंदे गटाने तीन चिन्ह सादर केले आहेत.;

Update: 2022-10-11 05:46 GMT

शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांच्या गटाला मशाल चिन्ह दिले. मात्र एकनाथ शिंदे गटाने सादर केलेले संभावित चिन्ह फेटाळण्यात आले होते. त्यानंतर शिंदे गटाला मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता. या वेळेत एकनाथ शिंदे यांच्या गटाने तीन चिन्ह सादर केले आहेत.

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांना नवे चिन्ह सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर दोन्ही गटाने चिन्ह आणि पक्षाचे नाव सादर केले होते. मात्र सोमवारी निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले. याबरोबरच उध्दव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले. मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटाने सादर केलेली तीनही चिन्ह नाकारल्यामुळे शिंदे गटाला मंगळवारी सकाळी 10 वा. पर्यंत चिन्ह सादर करण्यास वेळ देण्यात आली होती. त्यानुसार शिंदे गटाने संभाव्य निवडणूक चिन्ह सादर केले होते.

शिंदे गटाने  मंगळवारी सादर केलेले चिन्ह

  • सूर्य
  • पिंपळाचे झाड
  • ढाल-तलवार

शिंदे गटाने सादर केलेल्या तीन चिन्हांवर निवडणूक आयोगाकडून विचार सुरु आहे. मात्र यापैकी कोणत्या चिन्हावर शिक्कामोर्तब होणार याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

उध्दव ठाकरे गटाने पाठवलेली चिन्ह-

  • त्रिशूळ
  • उगवता सूर्य
  • मशाल

उध्दव ठाकरे गटाने पाठवलेल्या तीन चिन्हांपैकी त्रिशूळ आणि उगवता सूर्य ही चिन्ह नाकारली आणि ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले.

शिंदे गटाने सोमवारी कोणती चिन्ह सादर केली होती?

  • त्रिशुळ
  • गदा
  • उगवता सूर्य

शिंदे गटाने सोमवारी त्रिशूळ, गदा आणि उगवता सूर्य ही चिन्ह सादर केली होती. त्यापैकी त्रिशूळ आणि उगवता सूर्य ही चिन्हं समान असल्याने आणि गदा हिंसेचे प्रतिक असल्याने निवडणूक आयोगाने तीनही चिन्ह नाकारले. त्यानंतर शिंदे गटाने मंगळवारी सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचे झाड हे चिन्ह सादर केले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:    

Similar News