नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं होतं हाकलून, शिवसेना नेत्याची टीका
राज्यात शिंदे गट विरुध्द शिवसेना धुमशान रंगलं असतानाच नारायण राणे यांनी गद्दारी शिंदे गटाने नाही तर उध्दव ठाकरे यांनी केली असल्याची टीका केली. त्याला शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.;
राज्यात शिंदे गटाने गद्दारी केल्याचा आरोप शिवसेनेकडून सातत्याने केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गद्दारी एकनाथ शिंदे यांच्या गटाने नाही तर उध्दव ठाकरे यांनी केली. उध्दव ठाकरे यांनी गद्दारी करून मुख्यमंत्री पद मिळवल्याची टीका नारायण राणे यांनी केली. त्यावरून शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी एका बैठकीतून अक्षरशः हाकलून दिलं असल्याचे म्हटले. शिवाजीराव चोथे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना नारायण राणे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
यावेळी शिवाजीराव म्हणाले की, 1995 साली झालेल्या युती सरकारमध्ये राणे हे मंत्री होते. त्यानंतर राणे मुख्यमंत्री कसे झाले? हे संपुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे गद्दारी कुणी कुणाशी केली? हे नारायण राणे यांच्यासारख्या माणसाने शिकवू नये, असंही चोथे म्हणाले. तसेच नारायण राणे हे शिवसेनेतून हाकलून दिलेलं व्यक्तीमत्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी एका बैठकीतून नारायण राणे यांना अक्षरशः हाकलून दिलं होतं. ज्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना हाकलून दिलं होतं. त्या बैठकीला मी उपस्थित होतो, असं म्हणत शिवाजीराव चोथे यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला.
बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना हाकलून दिल्यानंतर त्यांनी आधी काँग्रेस नंतर स्वतःची संघटना आणि आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पुढे बोलताना शिवाजीराव चोथे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे वाघ आहेत आणि उध्दव ठाकरे याच वाघाचा बछडा आहे. त्यामुळे मातोश्रीच्या जीवावर मोठं झालेल्या नारायण राणे यांच्यासारख्यांनी म्याव म्याव करू नये, असंही म्हणाले.