राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी

Update: 2022-01-06 11:54 GMT

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या निवासस्थानी `शिवतीर्थ` मधे कोरोनाचा उद्रेक झाला असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळीमधील न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं आहे. परळीमधील प्रथम वर्ग परळी वैजनाथ दिवाणी न्यायालयाने (क स्तर) हे वॉरंट जारी केलं आहे. जामीन करून देखील सतत तारखेला गैरहजर राहिल्याने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात येत असल्याचं न्यायलायने म्हटलं आहे.

२००८ साली राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण न्यायालयात गेले होते.केस क्रमांक आर. सी. सी. १४०००३८/२००९ प्रकरणी परळी वैजनाथ न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीमध्ये वारंवार जामीन दिल्यानंतरही राज ठाकरे न्यायालयासमोर हजर राहिले नसल्याने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

न्यायालयामध्ये या प्रकरणी महाराष्ट्र सरकार विरुद्ध राज ठाकरे असा युक्तीवाद सुरु आहे. आरोपी हा सतत गैरहजर असल्याने आरोपीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात येत आहे. पुढील सुनावणीला त्यांना न्यायालयासमोर हजर करावे असं न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलंय.

राज ठाकरे यांच्या मुंबईतील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी करोनाचा शिरकाव झाला आहे. 'शिवतीर्थ'वरील चार कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपल्या पुढील १० दिवसांतील कार्यक्रम आणि बैठका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

Tags:    

Similar News