100 कोटींच्या वसूलीच्या आरोपातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने जामीन दिला आहे. मात्र त्यानंतर अनिल देशमुख यांनी ED वर गंभीर आरोप केले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असताना तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मुंबईतून 100 कोटी रुपयांची वसूली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांनी केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. तर आता अनिल देशमुख यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यानंतर अनिल देशमुख यांनी नागपूरमध्ये बोलताना या प्रकरमात माझा 21 महिने छळ करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
अनिल देशमुख म्हणाले, सचिन वाझेला (sachin Vaze) दोन खुनाच्या आरोपात अटक झाली होती. त्याच्या जबाबावर विश्वास ठेवता येणार नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तर मला 14 महिने खोट्या आरोपामध्ये तुरुंगात काढावे लागले.
आर्थर रोड (Arthar road jail) जेलमधील ज्या बिल्डिंगमध्ये दहशतवादी कसाबला (Terrorist Ajmal Kasab) ठेवलं होतं. त्या बिल्डिंगमध्ये मला ठेवलं होतं. या प्रकरणात मला 21 महिने त्रास देण्यात आला. तर माझे कुटूंबिय आणि सहकार्यांनाही या प्रकरणी त्रास देण्यात आल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला.
या प्रकरणात 230 सहकाऱ्यांचे जबाब, 130 धाडी टाकण्यात आल्या. मात्र यानंतरही मला न्यायालयाने जामीन दिला. त्याबद्दल न्यायदेवतेची मी आभार मानतो, असं अनिल देशमुख म्हणाले.
या प्रकरणात कुणाचा अदृष्य हात आहे, याची माहिती मी सगळ्यांना देणार आहे. याबरोबरच मी तुरुंगात असल्याने मला मतदारसंघात जाता आले नाही. पण माझा मुलगा सलील आणि सहकाऱ्यांनी सातत्याने मतदारसंघातील लोकांशी संपर्क कायम ठेवला. या काळात मला शरद पवार (Sharad pawar) यांनी आणि पक्षातील नेत्यांनी पाठींबा दिला, असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.