अंधेरी पुर्व पोटनिवडणूक 'धनुष्यबाण' चिन्हाविना होणार?

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पुर्व पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी भाजप आणि शिवसेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच शिवसेना कुणाची? यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. त्यातच अंधेरी पोटनिवडणूक जाहीर झाली असल्याने धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार यावरून चर्चांना उधाण आले आहे.;

Update: 2022-10-05 01:37 GMT

एकीकडे अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दुसरीकडे शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे सुरू आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना 7 ऑक्टोबर पर्यंत कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या पोटनिवडणूकीत भाजपासह शिंदे गट आणि ठाकरे गटानेही उमेदवार जाहीर केला तर निवडणूक आयोगासमोर पेच निर्माण होऊ शकतो. त्यावेळी धनुष्यबाण चिन्ह कुणाला द्यायचे? असा प्रश्न निर्माण होईल. त्यातच 7 ऑक्टोबरपासून अर्ज करण्यास सुरूवात होणार आहे. तर 14 ऑक्टोबर रोजी अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत आहे. या मुदतीत निवडणूक आयोगाला हा वाद सोडवता आला नाही तर निवडणूक आयोग 'धनुष्यबाण' चिन्ह गोठवू शकते, असं मत कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले.

उज्वल निकम म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात एक गोष्ट स्पष्ट केली आहे, निवडणूक चिन्ह आणि राजकीय पक्षाबाबत निर्णय निवडणूक आयोग घेईल. त्यानुसार अंधेरी पुर्व विधानसभेसाठी कोणते पक्ष उमेदवार उभे करणार ते पहावे लागेल. तसेच शिवसेनेतील दोन्ही गट उमेदवार देणार का? हे अजून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे जर दोन्ही गटाने उमेदवार उभे केले तर निवडणूक चिन्ह गोठवलं जाऊ शकतं, असंही उज्वल निकम म्हणाले.

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पुर्व पोटनिवडणूकीसाठी शिवसेनेतील ठाकरे गटाने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र राष्ट्रवादीने अंधेरी पुर्व पोटनिवडणूकीत ऋुतूजा लटके यांना पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले आहे तर शिंदे गटाने भाजपला पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे ही लढत भाजप विरुध्द शिवसेना अशीच होण्याची शक्यता आहे. मात्र या निवडणूकीत चिन्हावर शिंदे गटाने दावा केला तर अंधेरी पुर्व पोटनिवडणूक धनुष्यबाणाविना होण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News