Amit Shah on Adani : अदानी प्रकरणी अमित शाह यांनी सोडलं मौन

Amit Shah on Adani : संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात विरोधकांनी अदानी प्रकरणावरून मोदी सरकावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मौन सोडले आहे.

Update: 2023-02-15 02:58 GMT

संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात (Budget Session 2023) विरोधकांनी अदानी प्रकरणावरून सरकारवर घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah on Adani group) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमित शाह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अदानी प्रकरणावर भाष्य केले.

हिंडेनबर्गच्या (Hindenberg) आरोपानंतर देशात अदानी समुहाबाबत देशात वादंग निर्माण झाले आहे. त्यातच संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात विरोधकांनी भाजपला (BJP) चांगलेच घेरले आहे. तर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत अदानी आणि पंतप्रधान मोदी (PM Modi and Adani Connection) यांचे फोटो दाखवत या प्रकरणात भाजप कनेक्शन असल्याचा आरोप केला. त्यावर अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमित शाह म्हणाले, हा विषय सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) पोहचला आहे. त्यामुळे त्यावर आता भाष्य करणे योग्य ठरणार नाही. मात्र अदानी प्रकरणात आम्हाला काहीही लपवायचे कारण नाही. तसेच कुणी कितीही आरोप केले तरी घाबरण्याचे कारण नाही, असं मत अमित शहा यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, विशिष्ट उद्योगांना झुकते माप देणे, तकलुपी भांडवलशाही यांना अनुसरून मोदी सरकारवर आणि भाजपवर आरोप करणे, यात काडीचेही तथ्य नाही. काँग्रेसकडून करण्यात येत असलेले शेलके आरोप आतापर्यंत भाजपवर कुणालाही करता आले नाहीत. हे मी दाव्याने सांगू शकतो, असं अमित शाह म्हणाले.

राहुल गांधी (Rahul gandhi speech) संसदेत केलेले भाषण अदानी आणि हिंडेनबर्ग या संस्थेच्या संबंधित होते. त्यावर अमित शाह यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांना काय भाषण करायचे हे त्यांचा आणि त्यांना भाषण लिहून देणाऱ्याचा विषय आहे. याबरोबरच भाजपकडून लोकशाहीतील महत्वाच्या संस्थांवर कब्जा केल्याचा आरोप विरोधी पक्ष करत असतो. त्यावर अमित शाह यांनी उत्तर दिले आहे. अमित शाह म्हणाले, जर त्यांना खरंच असं वाटत आहे तर ते न्यायालयात का जात नाहीत? कारण न्यायालये तर आमच्या ताब्यात नाहीत ना? असा सवाल अमित शाह यांनी उपस्थित केला.

आमच्यावर करण्यात येणारे आरोप हे विरोधकांचे कटकारस्थान असल्याचा आरोप यावेळी अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर केला. तर अशा प्रकारच्या कटकारस्थानामुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही. कारण सत्य झाकलं जाऊ शकत नसल्याचा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

Tags:    

Similar News