विधान परिषदेत उद्धव ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेता

Update: 2022-08-10 07:05 GMT

शिवसेना कुणाची हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटाला विधिमंडळात मोठा दिलासा मिळाला आहे. विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेता म्हणून उपसभापतींनी मान्यता दिली आहे. त्यामुळे विधान परिषदेत उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना बाजूला सारत शिंदे यांनी पक्ष संघटनेत नियुक्त्या सुरु केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेवर वर्चस्व सिद्ध कऱण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कायदेशीर कारवाईला सुरूवात केली आहे. विधानसभेत गटनेता आणि प्रतोद पदावर कब्जा केल्यानंतर विधान परिषदेतही शिंदे गट आपली खेळी खेळणार अशी शक्यता असताना उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद द्यावे, अशी मागणी उपसभापतींकडे केली होती. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तातडीने ती मागणी मान्य करत मुख्य सचिवांना तसे आदेश देत अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त केले आहे.




 



विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे सध्या नीलम गोऱ्हे ह्यांच्याकडे अधिकार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ही खेळी खेळली आहे. पण अंबादास दानवे यांची नियुक्ती ही औट घटकेची ठरण्याची शक्यता आहे, कारण विधिमंडळात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची भर पडल्यास सभापती आणि उपसभापतीपदी सत्ताधाऱ्यांतर्फे नियुक्ती करणे सोपे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर येत्या अधिवेशनात नवीन सभापती आणि उपसभापती यांची निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटातील अंबादास दानवे यांची नियुक्ती रद्द होऊ शकते, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाआधी अनेक घडामोडी घडण्याची शक्यताही व्यक्त होते आहे.

Tags:    

Similar News