पुणे जिल्ह्यातील पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी भाजपची करणार नाकेबंदी? अजित पवार यांचे स्पष्टीकरण
भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात होणाऱ्या पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी भाजपची कोंडी करणार असल्याची चर्चा आहे. त्याबाबत अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.
भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार देऊन राष्ट्रवादी भाजपची (NCP Vs BJP) नाकेबंदी करणार असल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभुमीवर अजित पवार यांनी पोटनिवडणूकीबाबत राष्ट्रवादीची काय भूमिका असणार? याचे स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवार(Ajit pawar) यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले की, राष्ट्रवादी (NCP) स्वतःच्या ताकदीवर उमेदवार देण्याचा प्रयत्न करेल. तसेच या भागामध्ये सध्या भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shivsena) हे पक्ष कार्यरत आहेत. मी त्या भागात अनेक वर्षे काम करीत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील दिलीप वळसे पाटील (Dilip Walse patil) यांच्यासह स्थानिक नेत्यांशी आणि ज्यांच्या कार्यक्षेत्रात ही निवडणूक आहे. त्यांच्याशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ठरवली जाईल, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काढणार पंढरपूरचा वचपा
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने पंढरपूर-मंगळवेढा (Pandharpur Mangalvedha) विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपला विनंती केली होती. त्यानुसार राष्ट्रवादीने भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके (Bhagirath Bhalake) यांना उमेदवारी दिली होती. मात्र भाजपने समाधान औताडे (Samadhan Autade) यांना उमेदवारी देत ही लढत प्रतिष्ठेची करून जिंकली. त्यामुळे कसबा आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी पंढरपूरचा वचपा काढणार असल्याचे म्हटले जात आहे.