भाजपने राज्यातील 45 लोकसभा जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे. त्यानुसार तयारीही सुरु केली आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्यावर देण्यात आली आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजपच्या मिशन 45 बाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असता भाजपने मिशन 48 आणि मिशन 288 करावे, असा सल्ला दिला आहे.
भाजप (BJP) राबवत असलेल्या मिशन 45 बाबत अजित पवार (Ajit pawar) यांनी खोचक प्रतिक्रीया दिली आहे. भाजपने मिशन 45 नाही तर मिशन 48 आणि मिशन 288 राबवावे, असा खोचक सल्ला अजित पवार यांनी भाजपला दिला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, मी अधिवेशनाच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) उल्लेख स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा केला होता. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) गेल्या अर्थसंकल्पात पहिल्याच पानावर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेतले होते.
तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक पुणे (Pune) जिल्ह्यातल्या वढू बुद्रुक (Vadhu Budruk) आणि तुळापूर (Tulapur) येथे करण्यासाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. तसेच आम्ही घोषणा करुन आम्ही थांबलो नाही तर, त्यासाठीची आवश्यक सर्व प्रक्रीया पूर्ण केली. मी सातत्याने या स्मारकासाठी बैठका घेत होतो. कामाचा आढावा घेत होतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने 'छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार' (Chhatrapati Sambhaji Maharaj Shaurya Award) योजना आम्ही सुरु केली. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने यासंबंधी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक भारतीय जनता पक्षाला मान्य नाही का ? असा सवाल अजित पवार यांनी यावेळी केला.
अजित पवार पुढे म्हणाले, इतिहास संशोधकांनी या मुद्द्यांवर संशोधन करून वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे मांडणी करावी. खरा इतिहास समोर आणावा. लोकांच्या प्रबोधनासाठी ते उपयुक्त ठरेल. परंतु राजकीय हेतूने राज्यातील वातावरण तापवणे आणि विद्वेषाचे राजकारण करणे कदापि सहन केले जाणार नाही, असा खणखणीत दम अजित पवार यांनी विरोधकांना दिला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( bhagat singh koshyari)भगतसिंग महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करतात. पण त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात नाही. भाजपचे प्रवक्ते छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करतात. पण त्यांना राजीनामा मागितला जात नाही. चंद्रकांत पाटील यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. भाजपच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. प्रसाद लाड (prasad lad यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं वक्तव्य केले होते. त्यामुळे एवढं सगळं होऊनही भाजपने या नेत्यांविरोधात आंदोलन केले नाही. या नेत्यांचे राजीनामे मागितले नाहीत. पण मी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख केला तर हे माझा राजीनामा मागतात. पण मी आजही माझ्या मतावर ठाम आहे. कारण छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते आणि आहेत, असंही अजित पवार म्हणाले.