हिवाळी अधिवेशनापूर्वी अहमदनगरच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय होणार? ; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या नावाची चर्चा
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून बाजूला होण्याची इच्छा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्यानंतर आता पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याबाबत राजकिय गोटात कुजबुज सुरू झाली आहे. गृहविभागाच्या व्यापामुळे ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील हे पालकमंत्रीपद स्वीकारण्यास इच्छुक नसल्याने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात होणार्या हिवाळी अधिवेशनापूर्वी ही निवड जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे.
ग्रामविकास विभागाचा व्याप, कोल्हापूर ते नगरचे अंतर यामुळे विद्यमान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काही महिन्यांपूर्वीच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पालकमंत्री पदावरून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर नगर आणि अकोले येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देखील मुश्रीफ पद सोडण्याची इच्छा जाहीर केली होती. यामुळे नगरला नवीन पालकमंत्री कोण मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यानच्या काळात राज्यातील राजकीय घडमोडींमुळे ही प्रक्रिया लांबली. मात्र, आता पुन्हा पालकमंत्री बदलाच्या हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान या पदासाठी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मात्र गृहविभागाचा वाढता व्याप व जबाबदारी यामुळे नगरच्या पालकमंत्रीपदाला पूर्ण न्याय देवू शकत नाही, अशी भूमिका पाटील यांनी घेतली.
त्यामुळे राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील आठवड्यात हिवाळी अधिवेशनापूर्वी पालकमंत्री पदाचा हा बदल होण्याची शक्यता आहे.