शिवसेनेतील बंडानंतर राष्ट्रवादीची सावध पावलं, सर्व विभाग आणि सेल केले बरखास्त

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली. त्यामुळे याचाच धडा घेऊन राष्ट्रवादीने सावध पावलं टाकायला सुरूवात केली आहे.;

Update: 2022-07-21 04:26 GMT

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सर्वच पक्ष खडबडून जागे झाले आहेत. तर राष्ट्रवादीने सावध पावलं टाकायला सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरातील राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त केले आहेत. यासदर्भातील पत्रक राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादीने सर्व विभाग आणि सेल बरखास्त केले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीतही अशा प्रकारे बंड होऊ नये, यासाठी सर्व विभाग आणि सेल बरखास्त केले आहेत का? अशीही चर्चा रंगली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीने सुपर 100 अशी नवी संकल्पना समोर ठेवल्याने आगामी काळातील लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी पक्षीय बांधणी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून सर्व विभाग आणि सेल बरखास्त केले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीट करून एक पत्रक जारी केले. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादीचे विभाग आणि सेल बरखास्त केले असल्याचे म्हटले आहे. तर ट्वीटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकारणी विसर्जित करण्यात आल्या आहेत. तर हा निर्णय महाराष्ट्र आणि इतर कोणत्याही राज्याला लागू होणार नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News