सत्यजित तांबे यांच्यापाठोपाठ बाळासाहेब थोरात यांच्या निशाण्यावरही नाना पटोलेच?

सत्यजित तांबे यांच्या बंडापासून मौन असलेले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अखेर पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

Update: 2023-02-06 02:27 GMT

सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी नाशिक पदवीधर निवडणूकीत (Nashik Graduate Election) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय खळबळ उडाली होती. यानंतर काँग्रेसने सत्यजित तांबे आणि त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. याबाबत बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अवाक्षरही काढले नव्हते. मात्र सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर सत्यजित तांबे यांनी प्रदेश काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहे. त्यापाठोपाठ बाळासाहेब थोरात यांनीही संगमनेरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रतिक्रीया दिली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानपरिषदेच्या निवडणूकीत मोठं राजकारण झालं. मात्र सत्यजित तांबे चांगल्या मताने विजयी झाले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण जे राजकारण झालं ते व्यथित करणारं होतं. दरम्यानच्या काळात माझ्यावर जे आरोप करण्यात आले. त्याबरोबरच माझी भूमिका मी पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हा पक्षांतर्गत विषय असल्याने यावर बाहेर बोलणं योग्य नाही. मी माझं मत काँग्रेसमधील (Congress) नेत्यांना कळवले आहे. ते याबाबत योग्य निर्णय घेतील, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

गेल्या काही दिवसात माझ्याबद्दल अनेक गैरसमज पसरवण्यात आले, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर नाव न घेता टीकास्र सोडले. तसेच हे गैरसमज पसरवल्यानंतरही मी काँग्रेसमध्येच राहणार आहे. कारण काँग्रेसचा विचार हाच आपला विचार असून त्याच मार्गाने मी पुढील वाटचाल करणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

राज्यातील सत्तांतरानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिला जात आहे. अनेकांचे उद्योग बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच संघर्षातून आपण वाटचाल केली आहे, असंही थोरात म्हणाले. 

Tags:    

Similar News