गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत काँग्रेसचा हात सोडल्याच्या घटनेचा 48 तास उलटत नाहीत. तोच काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Update: 2022-08-28 04:10 GMT

गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यापाठोपाठ राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत तेलंगणामधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एम ए खान यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

तेलंगणामधील महत्वाचे नेते आणि माजी खासदार एम ए खान यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर टीका करत काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी राजीनाम्यामध्ये म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाचे तळागाळाशी असलेले नाते तुटले आहे. लोकांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळेच काँग्रेसची वाताहत झाली आहे. तर याला राहुल गांधी जबाबदार असल्याचे एम ए खान यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या उपाध्यपदाचा कारभार सांभाळल्यापासून काँग्रेसची परिस्थिती अधिकच खराब होत गेली. त्यामुळेच मी राजीनामा दिल्याचे एम ए खान यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसची विचारसरणी आहे. मात्र ही विचारसरणी बुथ पातळीपर्यंत पोहचवण्यात त्यांचे नेतृत्व अपयशी ठरल्याची टीका एम ए खान यांनी केली.

पक्षातील ज्येष्ठांशी कसं वागावं? हे राहुल गांधी यांना माहित नाही. तसंच राहुल गांधी यांच्या या धोरणामुळेच काँग्रेस पक्षाची वाताहत झाली आहे. तर सध्या काँग्रेस अशा पातळीवर येऊन पोहचली आहे की, गेली अनेक दशकं पक्ष उभा करणारे अनेक नेते सध्या काँग्रेसला सोडून जात आहेत. तर हे सगळ राहुल गांधीमुळे होत असल्याचेही एम ए खान म्हणाले.

राहुल गांधी यांनी जानेवारी 2013 मध्ये उपाध्यक्षपदाची सुत्र हाती घेताच पक्षाची सल्लागार यंत्रणा संपुर्णपणे नष्ट केली. तसेच पक्षातील अनुभवी नेत्यांना बाजूला सारले. यावेळी ज्यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही असा प्रकारचे लोक पक्ष चालवू लागले. तसेच राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांसमोरच सरकारी अध्यदेश फाडला हे बालिशपणाचे होते, असंही या राजीनामा पत्रात एम ए खान यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारामुळेच 2014 च्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला, असंही एम ए खान यांनी सांगितले.

2014 मध्ये काँग्रेस पराभूत होण्यास राहुल गांधी यांचा मोठा वाटा होता, असंही एम ए खान यांनी म्हटले आहे.




 

Tags:    

Similar News