सावरकरांबाबत केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडी फुटणार नाही- जयराम रमेश
वीर सावकरकरांबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात राजकारण तापले आहे. त्यातच संजय राऊत यांनी राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे फुट पडू शकते, असं विधान केले आहे. त्यापार्श्वभुमीवर जयराम रमेश यांनी सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फुट पडणार नसल्याचे म्हटले आहे. ते बुलढाणा येथे बोलत होते.
यावेळी बोलताना जयराम रमेश म्हणाले, माझे संजय राऊत यांच्यासोबत बोलणं झाले आहे. सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी ऐतिहासिक दस्तावेजाच्या संदर्भाने वक्तव्य केले आहे. मात्र संजय राऊत यांचे आणि त्यांच्या पक्षाची वेगळी मतं असू शकतात. तसेच संजय राऊत यांच्याशी झालेल्या संवादानंतर महाविकास आघाडीत फुट पडणार नसल्याचेही जयराम रमेश म्हणाले.
पुढे बोलताना जयराम रमेश म्हणाले, भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने मोठा प्रतिसाद व प्रेम दिले आहे. हे काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. राहुल गांधी यांनी एका सभेत बिरसा मुंडा ब्रिटांशासमोर झुकले नाहीत, हे सांगताना त्यांची तुलना सावरकरांशी केली. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. याबरोबरच सावरकरांच्या मुद्द्यावरून काही पक्ष व संघटना नाहक वातावरण तापवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र सावरकरांबाबत असलेले ऐतिहासिक सत्य कसे नाकारता येईल? असा सवाल उपस्थित करत भाजप, मनसे सह हिंदूत्ववादी संघटनांवर निशाणा साधला.
सावरकरांबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसने इतिहासाची मोडतोड करुन मांडणी केलेली नाही. द्विराष्ट्रवादाचा सिंद्धात सावरकर यांनीच मांडला. १९४२ च्या भारत छोडो, चले जावच्या चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते व मुस्लीम लीगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होते, हे ऐतिहासिक सत्य आहे, असंही जयराम रमेश म्हणाले.
राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही
राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत सर्व भारतयात्रींना काळजी आहे. कारण त्यांनी त्यांची आजी आणि वडील गमावले आहेत. मात्र राहुल गांधी कधी कधी सहजपणे लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा सुरक्षा रक्षकांची मोठी तारांबळ उडते. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे जयराम रमेश म्हणाले.
भारत जोडो यात्रेत महिला शक्तीचा नारा
काँग्रेसने देशाला इंदिरा गांधी यांच्या रुपाने देशाला पहिली महिला पंतप्रधान दिली. त्याबरोबरच राजीव गांधी यांनी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व मिळावे, यासाठी 33 टक्के आरक्षण जाहीर केले. पुढे नरसिंह राव यांनी 73 आणि 74 व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून महिलांना आरक्षण दिले. महाराष्ट्रातही काँग्रेस सरकार असताना महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण दिले, असं मत जयराम रमेश यांनी व्यक्त केले. तसेच जगातील महिलांना निवडणूकांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधीत्व देणारा भारत हो एकमेव देश आहे. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमीत्त 19 नोव्हेंबर रोजी देशभरातील काँग्रेस पक्षातून निवडून आलेल्या सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरपंचायत, महापालिका, आमदार आणि खासदार महिला भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे या यात्रेत 19 नोव्हेंबर रोजी 90 टक्के नारी शक्तीचे भारत जोडो यात्रेत दर्शन होत आहे.