प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला, नाना पटोले फडणवीस यांच्यावर भडकले

विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले आहेत.;

Update: 2023-02-09 08:19 GMT



काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यावर हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात हल्ला झाला. याबद्दल प्रज्ञा सातव यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली. मात्र यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक शब्दाचीही प्रतिक्रीया दिली नाही. त्यावरून नाना पटोले (Nana Patole) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्र सोडले.

नाना पटोले म्हणाले, प्रज्ञा सातव यांच्यावर केलेला हल्ला हा महाराष्ट्रातील गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. जर लोकप्रतिनिधींवर हल्ले होत असतील तर हे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलिस दलावर वचक नसल्याचे दिसून येत आहे.

राज्यात लोकप्रतिनिधी सुरक्षित राहिले नसून प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी नाना पटोले यांनी केली. तसेच या सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार खुलेआम दादागिरी करत आहेत. हातपाय तोडण्याची भाषा करीत आहेत. गोळीबार करीत आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येते. मात्र विरोधी पक्षाच्या आमदारांची सुरक्षा काढून घेतली जाते. त्यातच जर अशा प्रकारे हल्ले होत असतील तर लोकप्रतिनिधींनी काम कसे करायचे? असा सवाल नाना पटोले यांनी केला.

एका महिला आमदारावर हल्ला होऊनही उपमुख्यमंत्री त्यावर एक शब्दही बोलत नाहीत. यावरून त्यांचा असंवेदनशीलपणा दिसून येतो. याबरोबरच आधी आदित्य ठाकरे आणि आता प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याने महाराष्ट्राचे जंगलराज होऊ देऊ नका, असं म्हणत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली.

Tags:    

Similar News