मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार असल्याची चर्चा, शिवसेनेकडून खंडन
अजित पवार यांनी बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे हे राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यावर शिवसेनेने प्रतिक्रीया दिली आहे.;
अजित पवार यांच्याकडे वित्त खातं होतं. त्यामुळे आम्हाला निधी मिळत नव्हता. त्यामुळे मतदारसंघात विकासकामं राबवता येत नव्हते, असं म्हणत एक वर्षभरापुर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार सरकारमधून बाहेर पडले आणि त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्याप्रमाणेच आता अजित पवार यांनीही 40 आमदारांचा लवाजमा घेऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बहुतांशी आमदारांची कोंडी झाली आहे.
अजित पवार यांना विरोध करूनच आपण भाजपसोबत गेलो, अशी टिमकी मिरवणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना उत्तरं देतांना मोठ्या अडचणी येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर अजित पवार उपमुख्यमंत्री बनल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक नागपूर दौरा सोडून मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी तातडीने बैठक झाली. मात्र या बैठकीनंतर मंत्री उदय सामंत आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं.
अजित पवार सोबत आले म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्या महायुतीकडे 200 पेक्षा जास्त आमदारांचं संख्याबळ आहे. मात्र विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, असं शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले.
तसेच यावेळी झालेली बैठक ही विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीसंदर्भातील होती, असंही शंभुराज देसाई म्हणाले.