Maharashtra Politics : आदित्य ठाकरे यांचा विश्वासू सहकारी शिंदे गटात

आदित्य ठाकरे यांचे विश्वासू असलेल्या आणखी एका साथीदाराने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.;

Update: 2023-04-18 06:09 GMT

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि माजी नगरसेवक असलेल्या अमेय घोले (Amey Ghole) यांनी पत्र लिहून आपण ठाकरे गटातील पदांचा राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काही वेळातच अमेय घोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

अमेय घोले यांनी लिहीलेल्या पत्रात म्हटले होते की, मी तुमच्यामुळे राजकारणात आलो. तुम्ही मला युवा सेनेच्या माध्यमातून संधी दिली. तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली. मात्र वडाळा मतदारसंघात काम करताना श्रध्दा जाधव (Shraddha Jadhav) आणि शिवसेना सचिव सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी माझ्या कामात वारंवार अडथळे आणले. याबाबत मी आपल्याला माहिती दिली होती. मात्र त्यावर काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे खूप मनस्ताप झाला. त्यामुळे अखेरीस जड अंतःकरणाने पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहे. याबरोबरच युवासेनेच्या कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. आपली मैत्री राजकारणापुरती नाही. त्यामुळे मी पक्षात नसलो तरी आपली मैत्री जपू, असं अमेय घोले यांनी म्हटले आहे. मात्र यानंतर अमेय घोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

पक्षप्रवेशानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अमेय घोले म्हणाले, मी पक्ष सोडण्याचे कारण माझ्या राजीनामा पत्रात सांगितले आहे. मात्र सेनाभवनात आम्हाला मोकळेपणाने काम करता येत नव्हते. विधानसभा मतदारसंघात आम्ही गुणवत्तेच्या जोरावर कामं करत होतो, मात्र वरिष्ठांकडून अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता. याबाबत मी आदित्य ठाकरे यांच्याशी बोललो. मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत आहे, असं अमेय घोले यांनी सांगितले.




 


Tags:    

Similar News