उ.प्रदेश विधानसभा निवडणूक ही लोकसभा निवडणुकीआधी सेमी फानयल आहे, असे म्हटले जाते. पण ही निवडणूक सेमी फायनल नसून फायनल आहे आणि इथूनच भाजपच्या अंताची सुरूवात झाली आहे, अशी टीका समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली आहे. उ. प्रदेशात भाजपचा राजीनामा दिलेल्या दोन मंत्री आणि ५ आमदारांनी शुक्रवारी जाहीरपणे समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आभासी रॅलीमध्ये अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. स्वामी प्रसाद मौर्य, धरमसिंग सैनी यांच्यासह ५ आमदारांनी सपामध्ये प्रवेश केला.
यावेळी स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजप दलित आणि मागासवर्गीय विरोधी आहे, असा आरोप केला. सत्तेत येण्याआधी मागासवर्गीय व्यक्तींना मुख्यमंत्री केले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते, पण सत्ता येताच त्यांनी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवले, असा आरोप स्वामी प्रसाद मौर्य यांनी यावेळी केला. आपण ज्या पक्षाची साथ सोडतो त्या पक्षाचा सुपडा साफ होतो, मायावती ह्याचे जिवंत उदाहरण आहे, अशी टीका मौर्य यांनी यावेळी केली. तर गेल्या ५ वर्षात भाजपने उ. प्रदेशात ओबीसी आणि दलितांचे राजकीय, आर्थिक आणि रोजगाराच्या बाबतीत शोषण केले, असा आरोप धरमसिंग सैनी यांनी केला.
यावेळी अखिलेश यादव यांनी भाजपची एकेक विकेट पडत आहे असा टोला लगावत भाजपमधून सपामध्ये आलेल्या नेत्यांचे स्वागत केले. उ. प्रदेशात लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल निवडणुक होत नाहीये तर हीच फायनल आहे, इथूनच आता भाजपचा सुपडा साफ होण्यास सुरूवात झाली आहे. सपाची आघाडी राज्यात ४०० जागा जिंकेल असा विश्वासही अखिलेश यादव यांनी यावेळी व्यक्त केला.