संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन पहिल्या दिवसापासून आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधकांच्या आक्रमकतेमुळे संसेदेचे कामकाज अनेकवेळा ठप्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी लोकसभेतील चार खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले होते.
मंगळवारी राज्यसभेतही तब्बल १९ खासदारांना गैरवर्तनाचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे सात खासदार, डीएमकेचे ६, डाव्या पक्षांचे ३ खासदार, तेलंगणा राष्ट्र समितीच्य़ा ३ खासदारांचा समावेश आहे. या खासदारांनी राज्यसभेच्या सभापतींच्या आदेशानंतरही सातत्याने वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान सरकार तातडीने महागाई आणि जीएसटीच्या मुद्द्यावर चर्चा का घेत नाही, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. याच मुद्द्यावरुन राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले.