मुख्यमंत्र्यांचा ठाणे दौरा ठाणेकरांना पडला महागात

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे यांनी ठाणे दौरा केला. मात्र हा दौरा ठाणेकरांना चांगलाच महागात पडला.;

Update: 2022-07-05 02:57 GMT

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विश्वास दर्शक ठराव जिंकला आणि सरकारच्या स्थिरतेवरील प्रश्नचिन्ह तात्पुरते दूर झाले. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाले होते, त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आणि मग एकनाथ शिंदे महाराष्ट्रात परतले. परंतु आपला बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे या बंडानंतर परतले नव्हते. पण सोमवारी विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा ठाणे गाठले त्यांनी आनंद दिघे यांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले. एकीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच परतले असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता, मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पाऊस यामुळे ठाणेकरांना मात्र बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला.

ठाण्यात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साठलं होतं. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती. तर दुसरीकडे बंदोबस्तामुळे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे ठाण्यापासून घोडबंदर रोड किंवा दूर अंतरावरील भागात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक रिक्षा चालकांनी तर रिक्षाचे दर दुप्पट केले. एरवी पन्नास रुपये शेअर रिक्षा असणाऱ्या रिक्षा चालकांनी शंभर रुपये सीट दर केला होता. तर मीटरने जाण्वयाऐजी थेट दोनशे रुपये मागितले जात होते. प्रवाशांच्या हतबलतेचा फायदा घेत अनेक रिक्षा चालकांनी अवाच्या सवा भाडे घेत पैसे कमावण्याचा प्रकार ठाणे स्टेशन परिसरात घडला.

Tags:    

Similar News