शिवसेनेचे किती आमदार फुटले? देवेंद्र फडणवीस यांचं टार्गेट शिवसेना होती का?
विधानपरिषद निवडणूकीत शिवसेनेचे किती आमदार फुटले? देवेंद्र फडणवीस यांचं खरं टार्गेट शिवसेना आहे की कॉंग्रेस? कोणत्या पक्षाची किती आमदार भाजपच्या गळाला लागले वाचा विधानपरिषद निवडणूकीचं आकडेवारीसह विश्लेषण
राज्यसभा (Rajyasabha) असो की, विधानपरिषद निवडणूक महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) देवेंद्र फडणवीस (देवेंद्र फडणवीस ) यांच्या टीमने धोबीपछाड केलं आहे. मात्र, या दोनही निवडणूकीत शिवसेनेचं (Shivsena) सर्वांधिक नुकसान झालं आहे. वरकरणी पाहता विधानपरिषद निवडणूकीत कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी राज्यसभेत शिवसेनेच्या उमेदवाराचा झालेला पराभव आणि शिवसेनेची फुटलेली मत पाहता भाजपचं (BJP )टार्गेट शिवसेना आहे. असं दिसून येतं.
विधानपरिषद निवडणूकीत उमेदवाराला पडलेली मत पाहता शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. यामध्ये शिवसेनेचे स्वत:चे आमदार फुटल्याचं दिसून येतं. शिवसेनेने जरी विधानपरिषद राखली असली तरी शिवसेनेचा एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकंदरीत शिवसेनेची विधानपरिषद निवडणूकीत गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे.
प्रत्येक पक्षाला पडलेली मत...
भाजप:
प्रविण दरेकर: 29
उमा खापरे: 27
श्रीकांत भारतीय:30
राम शिंदे:30
प्रसाद लाड:17
एकूण वैध मत:133
एकूण उमेदवाराला मिळालेली मत:134 (उमा खापरे यांचं बाद झालेलं एक मत)
राष्ट्रवादी कॉंग्रेस
एकनाथ खडसे:29
रामराजे नाईक निंबाळकर:27
एकूण मत: 56
एकूण वैध मतदान: 57 (रामराजे नाईक निंबाळकर यांचं बाद झालेलं एक बाद मत)
कॉंग्रेस:
भाई जगताप: 20
चंद्रकांत हंडोरे:22
एकूण मत:42
आता शिवसेना
सचिन अहिर:26
आमशा पाडवी:26
एकूण मत: 52
आता शिवसेनेचे स्वत:चे 55 आमदार आहेत.
त्यामधील 3 आमदार फुटले असं वरकरणी आपण म्हणू शकतो. मात्र, ज्या अपक्ष आमदारांना मंत्रीपद दिली आहेत. हे आमदार फुटतील का?
बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. ते स्वत: मंत्री आहेत.
राजेंद्र यड्रावकर देखील मंत्री आहेत.
गडाख हे देखील कॅबिनेट मंत्री आहेत. एका पक्षाने दिलेले कॅबिनेट मंत्री पद सोडून हे आमदार भाजपच्या गळाला जातील का?
अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मग त्या फुटल्या असतील का? मंजुळा गावित यांनी देखील शिवसेनेला उघड पाठींबा दिला होता.
नरेंद्र भोंडेकर यांची गेल्या काही दिवसातील वक्तव्य पाहिली तर ते भाजपच्या जवळ जात असल्याचं वाटते. तर दुसरीकडे मुक्ताइनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे खडसे यांच्या प्रवेशाने अस्वस्थ आहेत. त्यामुळं त्यांचा भाजपकडे असलेला कल आपण समजू शकतो. मात्र, शिवसेनेच्या इतर आमदारांचं काय?
164 अपेक्षित मत पडतील असा अंदाज असलेल्या शिवसेनेचे स्वत:चे किती आमदार फुटले? राजकीय विश्लेषक कॉंग्रेसचा पराभव झाला म्हणून कॉंग्रेसमधील आमदार फुटल्याची चर्चा करत आहेत. मात्र, खरी मोठी फुट शिवसेनेत पडली आहे. शिवसेनेला जर अपक्ष आमदारांनी मत दिली असतील तर शिवसेनेची स्वत:ची किती मत फुटली का? भाजपला मिळालेली 134 मत ही एकट्या कॉंग्रेसच्या फुटीर आमदारांची आहेत का? कॉंग्रेसपेक्षा शिवबंधन बांधून फुटीर झालेल्या आमदारांची संख्या अधिक असल्याचा अंदाज पक्ष नेतृत्वाला नक्कीच आला असेल.
आता राहिला प्रश्न कॉंग्रेसचा... कॉंग्रेसचे विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देताना आपण पराभवाची जबाबदारी घेत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत जाऊन सगळी माहिती पक्षश्रेष्ठींना देणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. दिल्ली सध्या इडीचा गोंधळ सुरू असताना हे सगळं ऐकायला दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना वेळ आहे का? मुळात जर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी एका विधानपरिषद आमदाराच्या पराभवावर चर्चा केली असती तर कॉंग्रेसची ही अवस्था झाली असती का? हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळं यापेक्षाही वाईट स्थिती झाली तरीही राज्यातील कॉंग्रेसचा कोणताही नेता तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा वेगळं काही करणार नाही.
एकंदरीत आमदारांना न भेटणाऱ्या नेत्यांच्या पक्षाला मोठा फटका असं ठळक विश्लेषण आपल्याला वाचायला मिळू शकतं. मात्र, या निवडणूकीत पैश्याचा पूर आला असेल हे ही नाकारता येत नाही. त्यामुळं विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणूकीत आमदारांचा घोडेबाजार करणारा दलालच खरा किंगमेकर ठरला. असंच म्हणावं लागेल.