मोहसीन शेखला न्याय कधी ?
Max Maharashtra | 8 Jun 2019 3:56 PM IST
X
X
मोहसीन शेख या युवकाच्या हत्येला पाच वर्षे पुर्ण झाली आहेत. मात्र, या प्रकरणातील संशयित आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याच्यांसह १७ आरोपी सध्या जामिनावर सुटलेले आहेत. त्यामुळं पाच वर्षांनंतर का होईना मोहसीनला न्याय मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
काय आहे प्रकरण ?
अज्ञातांनी फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक मजकूर प्रसिद्ध केला होता. त्याचा हिंदू राष्ट्र सेना या संघटनेनं निषेध केला. त्यानंतर मोठ्याप्रमाणावर हिंसाचार उसळला होता. त्याच दरम्यान २ जून २०१४ रोज मोहसीन हा हडपसर परिसरात संध्याकाळी नमाज पठन करून घरी जातांना जमावानं केलेल्या मारहाणीत मृत झाला होता. मोहसीनचा मृत्यु हा हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीमुळेच झाल्याचा आरोप, मोहसीनच्या कुटुंबियांनी केला होता. त्यानंतर हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाई यांच्यासह २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर धनंजय देसाईसह २१ जणांना न्यायालयाच्या आदेशावरून तुरूंगात ठेवण्यात आलं होतं.
या खटल्यातील सर्व आरोपींना जामीन मिळाल्यानं धनंजय देसाईं यालाही जामीन मिळावा, अशी विनंती आरोपींचे वकील अभिजीत देसाई यांनी न्यायालयासमोर केली होती. तर मृत मोहसीनची आई शबाना परवीन यांनी संशयित आरोपी देसाईचा जामीन रद्द करण्यासाठी याचिका दाखल केलीय. जमाव जेव्हा गोंधळ करत होता, त्यावेळी धनंजय देसाई जिंदाबाद, हिंदू राष्ट्र सेना जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होता, तेव्हा धनंजय देसाई तिथं नव्हता, असा युक्तिवाद अँड. अभिजीत देसाई यांनी केलाय. देसाईनं कोणत्याही राजकीय गोष्टीत सामील न होण्याच्या अटीवर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश साधना जाधव यांनी धनंजय देसाईला जामीन दिलाय. पुर्नवसनाचं सरकारी आश्वासन अपूर्णच मोहसीनच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळाली पाहिजे, यासाठी त्याच्या वडिलांनी सरकार आणि विरोधी पक्षांकडे सातत्यानं पाठपुरावा केला. मात्र, १७ डिसेंबर २०१८ रोजी त्यांचाही ह्रदयविकारानं मृत्यु झाला. मोहसीनच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळाली पाहिजे, यासाठी आमचं संपूर्ण कुटुंब संघर्ष करत आहे. मोहसीनच्या मृत्युनंतर त्याच्या भावाला शासकीय नोकरी देण्याचं सरकारनं दिलेलं वचन अजूनही पूर्ण केलेलं नाही. याशिवाय ३० लाख रूपयांची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्ष १० लाख रूपये मिळाल्याचं शबाना यांनी सांगितलं.
मोहसीनसंदर्भात याचिका दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते अझर तांबोळी यांनी संशयित आरोपी धनंजय देसाईला जामीन मिळाल्यावर नाराजी व्यक्त केलीय. धनंजय देसाईच्या वकिलांनी १२ वेळा जामिनासाठी अर्ज केल्यानंतरही कोर्टानं तो फेटाळला होता. मात्र, देसाईवरील आरोपांचा पुर्नविचार करण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचा निकाल लागण्याआधीच न्यायालयानं त्याला जामीन दिला, ही दुःखाची गोष्ट असल्याचं तांबोळी म्हणाले. मोहसीन हत्याप्रकरणात एकूण 21 आरोपी होते त्यापैकी १७ जणांची जामिनावर सुटका झाली. मात्र, यापैकी ३ आरोपींवर खुनासारखे गंभीर आरोप असल्यानं ते तुरूंगातच आहेत. धनंजय देसाईला श्रीराम सेनेनं शौर्य पुरस्कार दिलाय. एका निरपराध मुलाला मारण्यात कोणतं सौर्य असल्याचं, तांबोळी यांचं म्हणणं आहे. देसाई जामिनावर बाहेर आल्यावर पुराव्यांसोबत छेडछाड करे, अशिलाला धमकावण्याचा प्रयत्न करेल, मलाही त्यांच्या संघटनेची लोकं सातत्यानं धमकावत असतात. मला या देशातील न्यायपालिकेवर विश्वास असून धनंजय देसाईचा जामीन नक्कीच रद्द होईल, अशी अपेक्षा तांबोळी यांनी व्यक्त केलीय.
जस्टीस फॉर मोहसीन मुव्हमेंट पुण्यात झालेल्या मोहसीन शेख हत्या प्रकरणाला पाच वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्याप न्याय मिळाला नाही, या मागणीसाठी जस्टीस फॉर मोहसीन या मुव्हमेंटतर्फे सोलापुरात निर्दशनं करण्यात आली. राज्यभरातले तरूण यामध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनात मोहसीनचा भाऊ मोबीनही सहभागी झाला होता.आंदोलकांच्या मागण्या मोहसीनच्या भावाला शासकीय सेवेत सामावून घ्यावं मोहसीनचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा सरकारी वकील तात्काळ नेमला जावा मोहसीनच्या कुटुंबियांना घोषित केलेली आर्थिक मदत द्यावी.
आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.
मोदी सरकार मोहसीनला न्याय देईल ? – अन्वर राजन, हिंदु-मुस्लिम प्रश्नांचे अभ्यासक
मोहसीन शेख हत्याप्रकरणातून प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माघार का घेतली, असा प्रश्न अन्वर राजन यांनी उपस्थित केला. ही केस ते का चालवू शकत नाही यामागचे कारणही त्यांनी सांगितलेले नाही. सोशल मीडियावर वादग्रस्त मजकूर टाकण्यांवर कारवाई का झाली नाही, त्यामुळं कायदा हातात घेणाऱ्यांना मोदी सरकारचं अभय आहे हा संदेश मोहसीनच्या हत्येनंतर सर्वत्र गेलाय. देशात ३०० पेक्षा जास्त मॉब लिंचिंगच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं आपल्याला या देशात कायदा सुव्यवस्था आणायची आहे की कायदा हातात घेऊन हिंसाचार कऱणाऱ्यांना अभय द्यायचं आहे, असा प्रश्नही अन्वर राजन यांनी उपस्थित केलाय. सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र आणि राज्य सरकारची आहे, त्यामुळं मोदी सरकार मोहसीनला न्याय देईल, अशी अपेक्षाही राजन यांनी व्यक्त केलीय.
Updated : 8 Jun 2019 3:56 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire