सहिष्णूतेचा कडेलोट
X
डॉक्टर आनंद तेलतुंबडे, दोनच दिवसांपूर्वी बोलणं झालं,आजच भेटायचं ठरवलं होतं, तुमच्या बोलण्यातला विषाद जाणवत होता,भारतात उपरेपणाची जाणीव तुम्ही बोललात, भीमा कोरेगाव च्या वैचारिक मांडणी बद्दल वेगळी भूमिका असलेला विचारवंत म्ह्णून तुम्हाला आम्ही जसे ओळखतो, तसेच थेट जागतिक वैचारिक आधुनिक जडणघडणीतला कार्यकर्ता म्हणून सुद्धा जाणतो, आता थेट नाम साधर्म्य आणि विचारधारा भीती या मुळे तुम्ही कुणाचेच शिल्लक राहिला नाहीत.
कसं असत आज तुम्हाला कुणी टोकाचा डावा किंवा टोकाचा उजवा असल्याशिवाय समजून घेऊच शकत नाही. तुम्हाला लाल किंवा भगवा नाहीतर हिरवा असल्या शिवाय गत्यंतर ठेवलं नाही. झपाट्याने पराकोटीचा द्वेष शिडात भरून आपली राजकीय गलबते फुटून जाई पर्यंत भरण्याचा अधाशी उद्योग आसपास सुरू आहे.
यंत्रणा जेव्हा भयानक वेगाने काम करतात, जनतेसाठी नाही कुण्या सत्तेच्या अदृश्य छायेत येऊन त्या छायेला खुश करू लागतात तेव्हा हे असंच व्हायचं.
आपण आज भेटू शकलो नाही, तुम्हाला तुमच्यावर ठेवलेल्या आरोपां बाबत पत्रकार म्ह्णून कोरडे मारावे असे प्रश्नं विचारू शकलो नाही याचं सुद्धा मला वाईट वाटतं आहे, वस्तुनिष्ठता जोपासायची तर तुम्हाला बरं वाटलं पाहिजे असे प्रश्नं तर विचारणं शक्य नाही.
पण ज्या भीमा कोरेगाव च्या "द्वेष यात्रेत"तुम्ही नव्हताच त्या यात्रेच्या आणि पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात तुम्हाला गोवलं जाणं हे अनाकलनीय आहे. जसं तुम्ही मला म्हणालात तुम्हाला जितकं अनाकलनीय आहे तितकंच आम्हाला ही.
शेवटी आम्ही कट्टरतेच्या कडेलोटाच्या टोकावर जायचं ठरवलंच आहे तर, जे अधले मधले आहेत, जे ना कट्टर उजवे ना डावे, त्यांना नको आधी ढकलून द्यायला ???
विरोधी विचार, नव्हे माणूसच उखडून टाकायचा हे धंदे दोन्ही कडच्या कट्टरतेने केले आहेत.. द्वेषाची ही गटार...आता तुमच्या आमच्या सारख्या डाव्या उजव्या च्या अधे मधे दाटीवाटीने बसलेल्या पर्यंत पोहचणारच, नको रे बाबा, बोलून काय उपयोग , शांत राहून बघुयात, बदलेल सगळं अश्या सारख्या सतरंज्या पसरून बसलेल्या सगळ्यांनाच हळू हळू भोगावं लागणार, ही द्वेषाची दुर्गंधी नाका तोंडात जाणार सगळ्यांच्याच यात शंका नाही..
प्रश्न अजून इतकाच आहे, संविधानिक चौकटी सोडून लोकांच्या कल्याणासाठी नव्हे तर स्वतः चे हिशोब करण्याच्या नादात यंत्रणा जेव्हा तुमच्यावर चाल करून येतात, तेव्हा अराजकाचा घंटानाद होऊ लागतो.
डॉक्टर आनंद तेलतुंबडे काय कुणाचेही विचार 100 % पटायलाच हवेत ,इतके वैचारिक मांद कुणातच येऊ नये, विचारधारा या वाहत्याच असायला हव्यात, पण दुसऱ्याच विचार पटला नाही म्हणून समूळ उपटून नष्ट करण्याचा नाद काही बरा नव्हे !
मंदार फणसे