महामंडळे स्वीकारून शिवसेनेने महाराष्ट्राची फसवणूक केली!: विखे पाटील
X
शिवसेनेने एकिकडे राजीनाम्याच्या आणि स्वबळाच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे महामंडळांची अध्यक्ष पदे स्वीकारून सरकारमधील आपला वाटा अधिक वाढवायचा, हा प्रकार दुटप्पी आणि महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करणारा असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
महामंडळावर झालेल्या नियुक्त्यांसंदर्भात कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. यावेळी विखे पाटील म्हणाले की, महामंडळाची अध्यक्ष पदे स्वीकारावीत की नाही, हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, मागील साडेतीन वर्षांपासून शिवसेना सत्तेत राहून सतत भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या नावाने कंठशोष करते आहे. आमचा सरकारशी काहीही संबंध नाही. आम्हाला सत्तेचे आकर्षण नसून, आमचे राजीनामे खिशात तयार असल्याचे सांगितले जाते आहे. यापुढे भाजपसोबत युती करून नव्हे तर स्वबळावर लढण्याच्याही वल्गना केल्या जात आहेत. या परिस्थितीत शिवसेनेने महामंडळांची अध्यक्ष पदे स्वीकारून आपल्याच दुटप्पी भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेला लोकांच्या प्रश्नांशी काहीही घेणेदेणे नाही. त्यांचे उद्दिष्ट फक्त सत्तेत जास्तीत जास्त वाटा मिळवण्यापुरतेच मर्यादित असल्याचे या निर्णयातून स्पष्ट होते,अशी टीका विखे पाटील यांनी केली.