Home > Uncategorized > पुरोगामी प्राणांची बाजी लावून जातीयवादी शक्तींशी लढले म्हणुन काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळत होती - प्रा.हरी नरके
पुरोगामी प्राणांची बाजी लावून जातीयवादी शक्तींशी लढले म्हणुन काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळत होती - प्रा.हरी नरके
Max Maharashtra | 30 May 2019 1:03 AM IST
X
X
महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी, सेना-भाजपा हे चारही प्रमुख पक्ष आजवर कधीना कधी सत्तेत होते/आहेत. हे मुळात वर्चस्ववादी, जातीय सरंजामी मानसिकतेला प्रमाण मानून चालणारे पक्ष आहेत. त्यांच्या कोणाच्याही विषयपत्रिकेच्या गाभ्यात वंचित- बहुजन- समाजांचे कल्याण हा विषय नव्हता. नाही. त्या पक्षात वंचित बहुजनांचे काही नेते असले तरी ते पक्षाच्या मालकांचे सालगडीच होते. आहेत.
त्यांना पक्षाची धोरणे ठरवण्याचा तीळमात्र अधिकार नव्हता. नाही. त्यांना व्यक्तीगत सत्ता मिळालीही असेल मात्र त्यातून वंचित-बहुजनांचा अजेंडा कधीही अग्रभागी आला नव्हता. येऊही शकत नाही.
वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या दहा ते १२ जागा पडल्या अशी हाकाटी केली जाते. तो निव्वळ राजकीय कांगावा आहे. तो करणारांनी वंचित बहुजनांना आजवर नोकरासारखेच वागवले होते ना?
मूठभर सरंजामदारांचे हे पक्ष वंचित बहुजनांना अपमानास्पद वागणूक देत होते. त्यांचं धर्मनिरपेक्षतेचं प्रेम निव्वळ बेगडी होतं. आहे. तोंडी लावायला सामाजिक न्याय, संविधान आणि फुले-आंबेडकर. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हाच यांचा एकमेव प्रोग्रॅम. यांचे घोटाळेसुद्धा आदर्श! आजवर पुरोगामी प्राणांची बाजी लावून जातीयवादी शक्तींशी लढत राहिले, म्हणुन काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळत होती. परंतु या सत्तेच्या दलालांनी त्याची कधीही जाणीव ठेवली नाही.
राजकारणात तुम्ही मिळवलेली मतं, तुमचा जनाधार, तुमचं उपद्रवमूल्य हीच तुमची शक्ती असते. ती दाखवल्याशिवाय कोणीही तुम्हाला मोजत नाही. राजकारण हा शक्तीपरीक्षेचाच खेळ असतो.
मुंबई मनपाच्या निवडणुकीत मागे राष्ट्रवादीनं एका नगरसेवकाच्या जागेसाठी काँग्रेसशी युती तोडली होती.
गुजरात विधानसभेला एन.सी.पी. नं उभ्या केलेल्या उमेदवारांनी काँग्रेसची मतं खाल्ली म्हणूनच तिथं भाजपाची पुन्हा सत्ता आली.
आता लोकसभेला युपीत स.प. - ब.स.पा. ची मतं काँग्रेसनं खाल्लीच ना?
तेव्हा परिवर्तनवादी जाऊन जाणार कुठे, त्यांना आपल्याशिवाय पर्यायच नाही हा राजकीय ब्लॅकमेलिंगचा सापळा आम्ही आता ओळखू लागलोत. जातीयवादी - धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आमच्या वळचणीला या, आमचे आश्रित व्हा असा खेळ हे दोघेही वंचित-बहुजानांशी कायम खेळत आले. जातीयवादी - धर्मांध शक्तींना रोखण्याच्या वल्गना करून त्यांच्याशी आतून साटंलोटं [मॅचफिक्सिंग] करणारे हे लोकच मुळात भाजप-सेनेची बी टिम आहेत. त्याचा पुरावाही त्यांच्या विरोधी पक्ष नेत्यांनी दिलाच आहे.
विधानसभेला बरोबरीच्या नात्यानं चर्चा करा, नाहीतर गेलात ढगात असं बजावण्याचा अधिकार वंचित- बहुजन नं कमावला आहे.
-प्रा.हरी नरके
Updated : 30 May 2019 1:03 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire