एअरस्ट्राइक आणि खूप सारे प्रश्न
मी वॉर एक्स्पर्ट नाही, मी परराष्ट्र धोरणांमधला तज्ज्ञही नाही. मी काही दिवस जम्मू आणि कश्मिरमध्ये रिपोर्टींग केलंय. त्यामुळे तिथल्या दुर्गम गावांमध्ये फिरलोय, अतिरेक्यांसोबतच्या क्रॉसफायरिंग आणि एन्कांउटर मी कव्हर केलेयत. निवडणूक कव्हर केलीय. त्यामुळे मला या भागातल्या राजकारण, समाजकारण, युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली आर्थिक-मानसिक परिस्थिती याचा थोडासा अंदाज आहे. तीन वेळेला आम्ही मरता मरता वाचलेलो आहोत, त्यामुळे इथल्या हवेतलं मृत्यूचं भयही मला जवळून अनुभवता आलंय. हे सांगण्याचं थोडक्यात कारण म्हणजे, केवळ याच मुळे गेले दहा बारा दिवस इथले सोशलवीर युद्धाची भाषा बोलत होते तेव्हा आम्ही सतत युद्धज्वराच्या विरोधात भूमिका घेत होतो. या भूमिकाला अनेकांनी राष्ट्रवादाचं परिमाण लावून पाहिलं, टीका केली.
भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर ज्या भारतीयांना आनंद झाला त्यात मी पण एक होतो, आणि एक भारतीय म्हणून ज्यांना ज्यांना चिंता वाटली असेल त्यात ही मी होतो. भारताने केलेला एअर स्ट्राइक एक अत्यंत गरजेची गोष्ट होती. त्या एअर स्ट्राइकचं टायमिंग भारताने ठरवलं होतं. त्यामुळे भारताला आता अनेक गोष्टींची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
1) भारताचा एक वीर पायलट पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्याला स्थानिक लोक मारहाण करत होते म्हणून पाकिस्तानी सैन्याने त्याला वाचवलं, त्याला सन्मानाची वागणूक दिली. उपचार दिले. चहा पिता पिता तो पाकिस्तानी सैन्याच्या या वागणूकीचं कौतूक करत आहे. यामुळे भारताचा जिनेव्हा कराराचा भंग झाल्याचा आरोप खोटा ठरू शकतो. जिनेव्हा करार फक्त युद्धात लागू असल्याने घोषित युद्धाशिवाय तो लागू पडेल का हा ही मोठा प्रश्न आहे.
2) भारताची दोन विमानं पडल्याचे व्हिज्युअल्स उपलब्ध आहेत, पण पाकिस्तानचं विमान पाडल्याचा भारताचा दावा सिद्ध करणारे पुरावे आपल्याला देता आलेले नाहीयत.
3) रॉयटर्स, बीबीसी, सीएनएन तसंच इतर अनेक आंतरराष्ट्रीय वाहिन्यांच्या रिपोर्टर्स ना भारताने दावा केल्या प्रमाणे एअर स्ट्राइकच्या ठिकाणी मृतदेह सापडले नाहीत.
4) भारतीय माध्यमांनी रिपोर्ट केलेला 300 अतिरेक्यांचा खात्मा सिद्ध होऊ शकलेला नाही.
5) भारतीय हवाई दलाच्या कारवाई नंतर अनेक जवानांना शहीद व्हावं लागलंय, काही नागरिकांचाही बळी गेलाय.
6) पाकिस्तानने पहिल्या दिवसापासून पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
7) भारतातल्या पत्रकार परिषदा फक्त माहिती देऊन गुंडाळल्या जातायत.
8) सीमेवर आक्रमकपणा दाखवणाऱ्या पाकिस्तानची भाषा पहिल्या दिवसापासून सौम्य राहिली आहे. उलट भारतातील नेत्यांनी प्रचारकी सभांमध्ये आक्रमक भाषेचा वापर सुरूच ठेवला आहे.
9) सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान हजर राहत नाहीत, इतर नेत्यांना पाठवतात. यावरून त्यांचा राजकीय अभिनिवेश दिसून येतोय. विरोधी पक्षांनी घेतलेली संयमाची भूमिका अशामुळे फार काळ टिकणार नाही, ज्याचा फायदा पाकिस्तान आपल्या प्रपोगंडा साठी करू शकतो.
10) भारतीय माध्यमांनी अजूनही अलंकारिक, आक्रामक आणि युद्धज्वराची भाषा सुरू ठेवली आहे, त्यामुळे हेच या देशातील खरं चित्र आहे असा समज निर्माण झाला आहे. अशा निर्बुद्ध, युद्धखोर वाहिन्यांवर सरकारने काहीच कारवाई केली नाही. दुर्लक्ष केलं.
11) मोदींनी आपले राजकीय प्रचारसभा आणि कार्यक्रम सुरूच ठेवले आहेत. या सर्व प्रकारामुळे मोदी सैन्याचा वापर निवडणूकांसाठी करतायत अशी भारताची प्रतिमा पाकिस्तानने सर्व पत्रकार परिषदांमधून मांडली आहे. तर ये नया पाकिस्तान है, हमे वॉर नहीं चाहीए, पर हम जवाब भी देना जानते हैं अशी एक लार्जर दॅन लाइफ प्रतिमा इम्रान खानने बनवायला सुरूवात केली आहे.
हे काही मुद्दे, प्रश्न, चिंता प्रामुख्याने या वातावरणात निर्माण झालेले दिसतायत. आता मोदींनी काय करायला हवं होतं, तुम्ही इकडूनही बोलणार आणि तिकडूनही असं ही अनेक लोकं बोलू शकतात. मला वाटतं सीआरपीएफ जवानांवर झालेला हल्ला हा भारतावरील हल्ला होता. तो केवळ एका तुकडीवर झालेला हल्ला नव्हता. आपल्या देशाने 26-11 च्या हल्ल्यानंतर निर्माण झालेली स्थिती प्रचंड डिप्लोमॅटीकली हाताळली होती. त्यावेळी मी जवळून सर्व प्रक्रीया पाहिली आहे. या केसचं काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने तपास केला, रिपोर्ट लिहिले, पुरावे गोळा केले, एक जिवंत अतिरेकी पकडला, अटकेत ठेवला, पाकिस्तानला एक डोसिअर सोपवण्यात आलं, त्याचा वापर करून ज्या पद्धतीचा दबाव पाकिस्तानवर टाकला त्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पाकिस्तानला नेहमीच आपली मान खाली घालून बोलावं लागलं होतं.
आपल्या देशातील जनतेला ही मुत्सद्देगीरी मान्य नसते, त्यांना नेहमीच लष्करी कारवाई हवी असते. जेव्हा राजकीय मुत्सद्देगीरी अपयशी ठरते तेव्हाच सैन्याचा वापर केला पाहिजे. उठसूठ सैन्याचा वापर करणारे राजकारणी, सत्ताधारी कमजोर असतात.
पुलवामा हल्ल्यानंतर आपण या संपूर्ण हल्लाचे पुरावे, अतिरेक्यांची संभाषणं, त्यांचे पाकिस्तानशी असलेले संबंध याचे पुरावे पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडले पाहिजे होते. पाकिस्तानच्या भूमीवरून सुरू असलेली अतिरेक्यांची पैदास यावर भारताने दबाव बनवला पाहिजे होता, जसा तो पठाणकोट हल्ल्याच्या वेळी आपण तयार केला होता. यामुळेच नंतरच्या सर्जिकल स्ट्राइकला नैतिक बळ मिळालं होतं.
असो, या सर्व पार्श्वभूमीवर आपण कुलभूषण जाधवची केस आंतरराष्ट्रीय न्यायालयात लढतोय. तिथे आपण पाकिस्तानची जवळपास कोंडी केलेली आहे. भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडरच्या पाकिस्तानमधल्या अटकेने या केसच्या भवितव्यावरही परिणाम होऊ शकतो. या सर्व बाबींचा विचार मोदींच्या थिंकटँकनी केलेलाच असणार आहे.
अनेक तज्ज्ञ सरकारला मार्गदर्शन करत असतीलच. मी आधीच सांगीतल्या प्रमाणे मी काही तज्ज्ञ नाही, गल्लीत बसून जे चार-पाच लोकं सरकारने हे करायला हवं, ते करायला हवं असं म्हणून गप्पा मारत असतात, कदाचित मी ही त्याच कॅटेगरीमध्ये मोडत असेन. पण, मला वाटतं त्याकडे मोठ्या मनाने दुर्लक्ष करून सध्या उपस्थित होत असलेल्या या प्रश्नांकडे पाहिलं पाहिजे, त्याची चर्चा केली पाहिजे.
विंग कमांडर अभिमंदन यांचं पाकिस्तानच्या कैदेत असणं, मला अस्वस्थ करतंय. त्यांची सुटका लवकरात लवकर व्हायला हवी, त्यासाठी भारताला जे-जे शक्य आहे ते भारताने केलं पाहिजे. पाकिस्तान ने भारताला इशारा दिलाय ‘वुई विल सरप्राइज यू..’, हा ही युद्धज्वर वाढवणाराच तसंच उकसवणारा इशारा आहे. भारताने पाकिस्तानला मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सरप्राइज दिलं पाहिजे. बाकी काही करता आलं नाही आलं तरी एक गोष्ट करता येऊ शकते, बाचाळ मंत्री, सुटलेले भक्त, ग्राफिक्स तसंच भक्ताळ व्हिडीयो बनवणाऱ्या फॅक्टरी यांच्यावर काही दिवस बंदी घातली पाहिजे. आज गरज आहे, देश म्हणून उभं राहण्याची. प्रत्येक गोष्ट पक्षीय अभिनिवेषाकडे नेण्याची नाही.
- रवींद्र आंबेकर